शिवसेना पक्षातील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले असून एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये मागील काही दिवसांपासून ठाण मांडून आहेत. त्यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतील या बंडावर भाष्य केले असून मंत्री गुलाबराव पाटील, मंत्र संदिपान भुमरे तसेच उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणारे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. संदिपान भुमरे यांनी हिंदुत्व शब्द हिलून दाखवावा असा टोला राऊत यांनी लगावला आहे. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा>>> शिवसेनेने परतीचे दोर कापले? बंडखोर आमदारांविषयी आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे वक्तव्य, घाण निघून गेली म्हणत दिले खुले आव्हान

“मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते कारण करोनाच्या काळात अनेक बंधनं होती. त्याचं आजारपण होतं. या सर्वाचा विचार स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्यांनी करावा. संजय शिरसाट यांनी पत्र पाठवलं. त्यांना लिहिता येतं का? समोर बसून तेच पत्र त्यांना लिहायला सांगा” असे म्हणत राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पत्र लिहिणाऱ्या संजय शिरसाट यांच्यावर खोचक टीका केली.

हेही वाचा>>> एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईत कधी येणार? दीपक केसरकर म्हणाले…

तसेच बंडखोर आमदारांमध्ये पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांचादेखील समावेश आहे. ते महाविकास आघाडी सरकारध्ये मंत्री आहेत. मात्र मंत्रिपद असूनही त्यांनी बंड पुकारले आहे. भुमरे यांच्यावरही राऊत यांनी खोचक टीका केली आहे. “संदिपान भुमरे सहा वेळा आमदार झाले आहेत. त्यांना तिकीट मिळावे म्हणून मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वाद घातला होता. मोरेश्वर सावे यांचे तिकीट कापून आम्ही त्यांना तिकीट दिले होते. त्यावेळी हे पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यावर सुरक्ष रक्षक म्हणून काम करत होते. ते आज कॅबिनेटमंत्री आहेत. हे आम्हाला कुठलं हिंदुत्व सांगत आहेत. त्यांना हिंदुत्व शब्द लिहिता येतो का? वर्गणी करुन लोकांनी त्यांना निवडून आणलेले आहे. मात्र आता हे निवडून येणार नाहीत,” असे संजय राऊत म्हणाले.

“…तर उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते,” शिवसेनेतील बंडाळीनंतर संजय राऊतांची महत्त्वाची माहिती

दोन दिवसांपूर्वी काही प्रमुख मंत्री वर्षा बंगल्यावर बसले. पुढील योजनेसंदर्भात चर्चा सुरु होती. मात्र गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील हे सगळे वरिष्ठ मंत्री आहेत ते दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला निघून गेले. गुलाबराव पाटील हे शिवसेनेतील सर्वात जुने आहेत. त्यांची भाषणं ऐकली असतील तर ते माझ्यासारख्या पानटपरीवाल्याला शिवसेनेने कसं मोठं केलं याबाबत स्वत: सांगायचे. आता ते पळून गेले. याला काय म्हणायचं?” अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते तथा आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर केली.

हेही वाचा>>> Narhari Zirwal Notice : एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या? विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस, ४८ तासांचे अल्टिमेटम

दरम्यान, राजीनामा द्या आणि परत निवडणुकीच्या रिंगणात उतरा, असे खुले आव्हान आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना केले जात आहे. तर दुसरीकडे आम्ही अजूनही शिवसेनेतच असून महाविकास आघाडीसोबत जाण्याची आमची तयारी नाही, असे हे बंडखोर आमदार म्हणत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes sanjay sirsath sandipan bhumare and gulabrao patil amid eknath shinde revolt prd
First published on: 25-06-2022 at 22:55 IST