रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणाच्या भावनांना ठेच पोहचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी फक्त सत्य सांगितले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“जे लोक गुवाहाटीमध्ये आहेत त्यांचा आत्मा मेला आहे आणि आता त्यांचे शरीर उरले आहे. इथे तर त्यांचे फक्त शरीर येणार आहे त्यात आत्मा कुठे आहे? हे मी बोललो असेल तर त्यामध्ये एवढं मनाला लावून घ्यायचे कारण काय? तुम्ही समजून घेत नाहीत. गुलाबराव पाटील बाप बदलण्याची भाषा बोलत आहेत. गुवाहाटीमध्ये जे बसले आहेत त्यांच्यासाठी गुलाबराव पाटील यांचे भाषण मार्गदर्शन करणारे आहे. जे लोक ४० वर्षे पक्षात आहेत त्यांचा आत्मा गेला असेल तर जिवंत प्रेत उरते. महाराष्ट्रासोबत संपर्क तुटल्याने अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. मी कोणाच्या भावनांना ठेच पोहचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी फक्त सत्य सांगितले आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

“त्या लोकांमध्ये फार हिंमत आहेत म्हणून ते आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांना सुरक्षा देत आहेत. मग त्यांना भिती कसली? महाराष्ट्राचे पोलीस त्यांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. लोकांच्या संतापाला कोणताही कायदा रोखू शकत नाही. त्यामुळे शेवटी तुम्हाला भाजपाची गुलामी करुनच सुरक्षा मिळवावी लागत आहे. पण अशी वणवण फिरायची गरज नाही. इथे सुद्धा हवा, पाणी, हॉटेल सगळं काही आहे, असेही संजय राऊत म्हणाले.