अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर शरसंधान केले आहे. काँग्रेस राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी वाढत गेली तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवांत या विषयावरील जनजागृतीचे देखावे बेडरपणे सजवले जात होते. आज महागाई, बेरोजगारीबाबत जागृती करणारे ‘देखावे’ एखाद्या सार्वजनिक मंडळाने उभे केले असतील तर दाखवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा देशातील आर्थिक स्थिती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, यंदाची गणपतीची स्वारी वाजतगाजत येणार की मंदीच्या रस्त्यावरून धिम्या गतीने येणार यावर चर्चा सुरू आहे. आर्थिक मंदीच्या संकटाने महाराष्ट्रात बेरोजगारीचा पहाड निर्माण झाला आहे. तरीही बेरोजगार हात मोठ्या डौलाने घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करतील. आता गणपतीचा उत्सवही मराठीजन साधेपणाने साजरा करतील. पण त्यानंतर येणारा नवरात्रोत्सव आणि श्रीमंतांचा दांडिया पूरग्रस्तांचे भान ठेवील काय, ही शंकाच आहे. मंदीचा फटका मराठमोळ्या सणांना बसतो तसा ‘रास दांडियां’ना बसणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

टिळकांचा गणेशोत्सव आता राजकीय पुढाऱयांचा उत्सव बनला आहे. ‘गणेशोत्सवावर या वेळी मोदींचा प्रभाव’ अशा बातम्या मी वाचल्या. याचा नेमका अर्थ मला समजला नाही. काँग्रेस राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी वाढत गेली तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवांत या विषयावरील जनजागृतीचे देखावे बेडरपणे सजवले जात होते. आज महागाई, बेरोजगारीबाबत जागृती करणारे ‘देखावे’ एखाद्या सार्वजनिक मंडळाने उभे केले असतील तर दाखवा. मोदी सरकारने 370 कलम, ट्रिपल तलाक याबाबतीत उत्तम कामगिरी पार पाडली आहेच. त्यावरही देखावे व्हावेत, पण मोदी व शहा यांना म्हणजेच सरकारला जे लोक विघ्नहर्त्या गणपतीच्या स्वरूपात पाहतात त्यांनी महागाई, बेरोजगारीचे विघ्न कोणी दूर करावे यावरही गणेशोत्सवात जागृती करायला हवी, असे राऊत म्हणाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार गणेशोत्सवातील मेळ्यांतून होत असे. अशा अनेक मेळ्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक हजेरी लावत. सरकारचा विरोध न जुमानता अशा मेळ्यांत पदे व कवने म्हटली जात. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना हे मेळे धोकादायक वाटले म्हणून त्यांनी मुस्कटदाबी सुरू केली. मेळ्यांवर बंदी आणि बोलण्यावर बंदी आली, पण स्वातंत्र्याचा हुंकार याच सार्वजनिक गणेशोत्सवांतून बाहेर पडला. आज ‘मारक शक्ती’चे पुरस्कर्ते संसदेत आणि सभोवती दिसू लागले. स्वातंत्र्य धोक्यात आल्याची ओरड सुरूच आहे. विज्ञानाचा दुरुपयोग सर्वच पातळ्यांवर सुरू आहे. ही विघ्ने गणपती कशी दूर करणार? गणराया, तूच काय ते पहा रे देवा, अशी विनवणी राऊत यांनी गणरायाकडे केली आहे.

‘मारक शक्ती’ने बेरोजगारी व आर्थिक मंदीचे संकट मारता येईल-
गणपती हा विज्ञाननिष्ठ देव आहे. गणपती व चंद्र यांचा संबंध आहे. आता आपण चंद्रावर ‘यान’ सोडले आहे. पण सुधारणा, विज्ञानाचा आज काही संबंध राहिला आहे काय? भारतीय जनता पक्षाच्या एक खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची वक्तव्ये विज्ञानवादी गणपती व सुधारणावादी हिंदुस्थानचे पाय खेचणारी आहेत. भोपाळमध्ये निवडणूक लढवताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एक वक्तव्य केले, ‘‘माझ्या शापामुळेच हेमंत करकरे मरण पावले.’’ आता त्याच प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नवे तारे तोडले आहेत, ‘‘विरोधकांनी ‘मारक शक्ती’चा वापर म्हणजे जादूटोणा केल्यामुळेच सुषमा स्वराज व अरुण जेटली यांचा मृत्यू झाला.’’ प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी कायद्यात बसते काय? जादूटोण्यात इतकी शक्ती असती तर त्या जादूटोण्याने पाकिस्तानचा नायनाट करता येईल. त्या ‘मारक शक्ती’ने बेरोजगारी व आर्थिक मंदीचे संकट मारता येईल. प्रज्ञासिंह ठाकूर या ‘साध्वी’ आहेत व त्यांनी तपस्येतून मोठी शक्ती मिळवली असेल तर दिल्लीतील नेत्यांचे मृत्यू घडवणाऱया यमराजास त्यांनी ‘प्रेरक शक्ती’ने रोखायला नको होते काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.