scorecardresearch

‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र, मुंबईसाठी विशेष तरतूद करा,’ संजय राऊतांची केंद्राकडे मागणी; म्हणाले, “हा पैसा भाजपाचा नव्हे, तर…”

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

sanjay raut on budget 2023
संजय राऊत (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या वर्षात देशात वेगवेगळ्या ९ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसे येत्या १४ महिन्यांत लोकसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात केंद्र सरकार कोणकोणत्या आकर्षक घोषणा करणार तसेच या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला काय मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. तसेच हा अर्थसंकल्प भाजपाचा नव्हे तर जनतेचा आहे. हा पैसा भाजपाचा नव्हे तर लोकांचा आहे, असेही राऊत म्हणाले. ते आज (१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> मशिदीतील बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी मंत्र्याचे विधान; म्हणाले, “भारतातही भाविक मारले गेले नाहीत, पण…”

महाराष्ट्र आणि मुंबईसाठी केंद्राने वेगळी भूमिका घेणे गरजेचे

“महाराष्ट्रच्या बाबतीत केंद्र सरकारने राज्यासाठी एक वेगळी आणि स्वतंत्र भूमिका घेणे गरजेचे आहे. मुंबईसाठीही केंद्राने वेगळी भूमिका घेणे गरजेचे आहे. मोदी वारंवार मुंबईचा दौरा करत आहेत. याचा अर्थ हा आहे की मुंबई महानगरपालिका हे त्यांचे लक्ष आहे. त्यांनी मुंबईला फक्त राजकारणासाठी येऊ नये. मुंबईला येताना काहीतरी घेऊन यावे. मुंबईने सातत्याने देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. अनेक गरीब राज्यांचं पोट मुंबईमुळे भरलं जातं. मुंबईत अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी केंद्राची गरज आहे. त्यासाठी आम्ही सरकारला पत्राने व्यवहार केला आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान आणि अर्थमंत्री विचार करतील,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> Union Budget 2023 Live Updates: काय स्वस्त, काय महागणार? अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण कोणत्या घोषणा करणार? वाचा अर्थसंकल्पाशी निगडीत प्रत्येक अपडेट!

मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे

“अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. लाखोंचे रोजगार देणारे उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले. या अर्थसंकल्पामधून काही भरपाई दिली जात असेल तर आम्ही केंद्र सरकारचे आभार मानू. हा पैसा भाजपाचा नसून जनतेचा आहे. हे बजट भाजपाचे नसून जनतेचे आहे,” असेही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 10:05 IST