महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगात आली आहे. आज सकाळीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत पार पडली. त्यानंतर अजित पवारांनीही मुलाखती दिल्या. देवेंद्र फडणवीसही प्रचारसभा, रॅली, मुलाखती करत आहेत. दरम्यान या सगळ्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे आणि संजय राऊत म्हणजेच राजकारणातले कट्टर विरोधक एकमेकांच्या समोर आले. संजय राऊत दिसताच एकनाथ शिंदेंनी त्यांना नमस्कार केला आणि प्रकृतीची चौकशी केली. काही क्षणांसाठी झालेल्या भेटीची चर्चा माधम्यांमध्ये रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरुन एकनाथ शिंदे हेदेखील येत होते. हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारपणातून बाहेर आले आहेत. ते आजारी असताना घरी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करुन राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आज या कार्यक्रमात संजय राऊत थेट त्यांच्यासमोरच आले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर एक-दोन मिनिटं जुजबी गप्पा मारुन हे दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. मात्र, या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंचं सर्वात मोठं बंड

एकनाथ शिंदेंच्या सर्वात मोठ्या बंडामुळे शिवसेनेची दोन शकलं झाली. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्हही एकनाथ शिंदेंना दिलं. यामुळे त्यांचा पक्षच अधिकृत शिवसेना ठरला. विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदेंनी ६० जागा निवडून आणल्या. शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. संजय राऊत यांनीही सातत्याने एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीत ५० खोके एकदम ओकेचा प्रश्नही आला होता. त्यावर राज ठाकरेंनी भाष्यही केलं. असं असूनही संजय राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटले. राजकारणात कितीही वैर असलं तरीही त्या पलिकडे जाऊन माणुसकीचे संबंध जपायचे असतात हे महाराष्ट्राने कायमच पाहिलं आहे. त्याचीच प्रचिती या भेटीमुळे पुन्हा आली.