गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर सातत्याने ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून या कारवाईसाठी केंद्र आणि राज्यातल्या भाजपाला जबाबदार धरण्यात येत असून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे आरोप केले जात आहेत. या कारवायांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत असतात. आजही त्यांनी याच कारवायांवरून भाजपावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांसाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला जबाबदार धरलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेवर भाजपा पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. थोडे जरी पैसे खर्च केले तरी भाजपा लगेच ईडीला कळवेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. भाजपा आणि ईडी कारवाईसंदर्भात भाष्य करताना संजय राऊत म्हणाले,”पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं”.

हेही वाचा – “…हा पालकमंत्र्यांसाठी इशारा आहे”; महाविकास आघाडीतल्या नाराजीच्या चर्चांबद्दल संजय राऊतांचं मोठं विधान

अजानच्या भोंग्यांवरूनही त्यांनी मनसे आणि भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले,”राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपाशासित राज्यांचं प्रमाणही जास्त आहे. मी गोव्यात होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातले भोंगे तसेच आहेत. काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यांचं पालन व्हायला हवं”.