scorecardresearch

संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी तक्रारही दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!
(प्रातिनिधिक छायाचित्र)

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवलं. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

“संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

याचबरोबर, “आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2022 at 11:08 IST

संबंधित बातम्या