Sanjay Raut Kapil Sibal Interview: गृहमंत्री अमित शाह तडीपार असताना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांना मोठी मदत केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना (उबाठा) नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. कपिल सिब्बल यांच्या ‘दिल से’ या कार्यक्रमात राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक स्फोटक खुलासे आणि गौप्यस्फोट त्यांनी केले. महाराष्ट्रातील सत्तांतर, तपास यंत्रणांचा वापर आणि त्यांचा तुरुंगातील अनुभव यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.

अमित शाह यांनी घेतली बाळासाहेबांची मदत

“मातोश्रीच्या गेटवर अमित शाह येऊन थांबले होते. त्यांचा संदेश बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पोहोचवला जात होता. दुसऱ्या दिवशी अखेर शाह यांना बाळासाहेबांना भेटता आले. शाह त्यावेळी तडीपार होते व त्यांचे काही खटले मुंबईत सुरु होते. त्यांनी बाळासाहेबांना भेटून सर्व प्रकार सांगितला, अनेक खटले आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाचे कथन केले. व मदत करण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना फोन करुन न्यायाधीशांना भेटून फोन करण्यास सांगितले. बाळासाहेबांनी न्यायाधीश यांच्याशी संवाद साधून अमित शाह यांना सहकार्य करण्यास सांगितले व त्यांना मदत झाली”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

शरद पवारांकडूनही घेतली मदत

“शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. यावेळी अमित शाह यांच्याविरोधात एसआयटीची चौकशी सुरु होती. मोदींनी काही अधिकाऱ्यांशी बोलणं केलं होतं पण, एक महाराष्ट्र केडरचा अधिकारी तयार होत नव्हता. त्यावेळी मोदींंनी चौकशीतून मार्ग काढण्यासाठी शरद पवारांची मदत घेतली. पवारांनी अधिकऱ्याला सांगून त्यांना मदत केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संकटकाळात मदत केली त्यांचेच पक्ष फोडण्याचे काम भाजपाने केले”, अशी टीका संजय राऊतांनी केली. दोन्ही किस्से संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या त्यांच्या पुस्तकातही लिहले असल्याचे ते म्हणाले.

Sanjay Raut And Kapil sibal

Sanjay Raut And sibal (Photo- Video Grab From Youtube Show Dil se with Kapil Sibal)

एकनाथ शिंदे काही मोठे नेते नाहीत – संजय राऊत

“एकनाथ शिंदे काही मोठे नेते नाहीत, त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री बनवले. बंडाच्या एकदिवस आधी एकनाथ शिंदे माझ्याकडे आले आणि म्हणाले की, माझे आता तुरुंगात जाण्याचे वय नाही. भाजपाबरोबर युती करावी लागेल नाहीतर सर्व नेते अडचणीत येतील. आम्ही त्यांना हिम्मत ठेवण्यास सांगितले पण, भाजपाने संधी साधून शिवसेनेचे आमदार फोडले आणि शिंदेंना मुख्यमंत्री केले”, असे संजय राऊत यांनी या मुलाखतीत सांगितले. शिवसेनेला एक वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नसणाऱ्या अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री केले असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन काम केले त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून माझ्याविरोधात षडयंत्र करण्यात आले, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

Sanjay Raut And Kapil sibal
Sanjay Raut And sibal (Photo- Video Grab From Youtube Show Dil se with Kapil Sibal)

आर्थर रोड तुरुंगाची भीषण अवस्था

“तुरुंगात कोणतीही सुविधा नव्हती. मुंबईत ईडीचे कारावासच उपलब्धच नाही. ईडीच्या ऑफीसमध्ये रात्री टेबलवर झोपावे लागत असे.” आर्थर रोड तुरुंगाची अवस्था फार भीषण असल्याचे संजय राऊत म्हणाले. “तुरुंगाची क्षमता ७५० असून, मी तिथं असताना तुरुंगात साडेआठ हजार कैदी होते. सकाळी सातच्या आधी सार्वजनिक शौचालयात अंघोळ उरकावी लागे. तुरुंगात कसाबच्या शेजारील अंडा सेलमध्ये ठेवले होते आणि एका बाजुला अनिल देशमुखही होते”, असे संजय राऊत म्हणाले. तुरुंगात लाडू, बटाटा वडा लक्झरी आयटम म्हणून जप्त केले जात, असा अनुभव त्यांनी सांगितला.

भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

“२०१४ नंतर लोकशाहीचा मूळ ढाचा बदलला असून निवडून आलेली सरकारे पाडणे हा भाजपचा उद्योग झाला आहे. महाराष्ट्रात ५०-५० कोटी देऊन आमदार विकत घेतले जात आहेत. हे पैसे जमिनीतून येत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला . इस्रायल-इराण वादावर बोलताना त्यांनी भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पंतप्रधान ‘विश्वगुरू’ म्हणवून घेतात पण महत्त्वाच्या वेळी गप्प का राहतात”, असा सवाल संजय राऊत यांनी मुलाखतीत केला