“मला कळत नाही संजय राऊतांचे आभार मानू की आश्चर्य व्यक्त करू”: किरीट सोमय्या

संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतल्या घोटाळ्यासंबंधी एक खळबळजनक पत्र किरीट सोमय्यांना पाठवलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना काल एक खळबळजनक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा असं म्हटलं आहे. यासंदर्भात आता किरीट सोमय्या आपण गोंधळात पडलो आहे असं म्हणत आहेत.

या प्रकरणावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचं आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावी”.

हेही वाचा – “ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ५०० ते ७०० कोटींचा घोटाळाही उघड करा ”; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र!

ते पुढे म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीचं प्रशासन आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे. कारण एक परमबीर सिंगही ते शोधू शकले नाहीत. मी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की, त्यांनी आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचं कौतुक केलं”.

नक्की काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना काल एक खळबळजनक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा असं म्हटलं आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन संजय राऊत यांनी पत्राद्वारे केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut kirit somayya i am confused whether i should thank him or not vsk

ताज्या बातम्या