"माफी मागा नाहीतर…" संजय राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा| Sanjay Raut Legal Notice to Union Minsiter Narayan Rane | Loksatta

“माफी मागा नाहीतर…” संजय राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी

sanjay raut and narayan rane
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नारायण राणे यांनी माफी मागावी नाहीतर खटला दाखल करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून नारायण राणे यांना नोटीस पाठवली असल्याचं स्पष्ट केलं आहे. नारायण राणे यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे आहेत असंही म्हटलं आहे. तसंच नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर मी एकटाच नाही तर ज्या शिवसेनेच्या नेत्यांविरोधात ते बोलले आहेत ते सगळे नोटीस पाठवणार आहेत असंही म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

भाजपाच्या नादाला लागून माणसाने किती खोटं बोलायचं ? याला काही मर्यादा आहेत. नारायण राणे यांनी सातत्याने माझ्याबाबत काही वक्तव्यं केली आहेत जी खोटी आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणे यांनी या नोटीसनंतर माफी मागितली नाही तर मी त्यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करेन असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्यांवरही मी खटला दाखल करणार आहे. मी एकटाच नाही तर ज्या शिवसेनेच्या नेत्यांविरोधात खोटेनाटे आरोप केले गेले आहेत ते सगळेच नेते खटले दाखल करणार आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय आहे संजय राऊत यांचं ट्विट?

नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. हे आरोप त्यांनी सिध्द करावेत अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांचा नारायण राणेंना टोला

नारायण राणे उद्या कदाचित असंही म्हणू शकतात की बाळासाहेबांची नियुक्ती मीच शिवसेनाप्रमुखपदी केली असंही म्हणतील. नारायण राणे म्हणतात २००४ मध्ये त्यांनी मला खासदार केलं. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे काय शिवसेना प्रमुख होते का? नारायण राणे काहीही वक्तव्य करू शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. शिवसेना सोडून नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ते भाजपात गेले. भाजपात गेल्यावर त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळालं. त्यानंतर ते सातत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका करताना आणि विविध आरोप करताना दिसत आहेत. राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आजचा नाही तर २००६ पासूनचा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:41 IST
Next Story
चिंचवड पोटनिवडणूक: महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे लढण्याची शक्यता?, राहुल कलाटे यांचे पुन्हा जगतापांना आव्हान!