“दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण ते…”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावेळी पत्रकारांंशी बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

Dadra and Nagar Haveli LS by election Sanjay Raut react on presence of Union Ministers

राज्यात भाजपासोबतचा २५ वर्षांचा संसार मोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सवता-सुभा केला आणि सरकार स्थापन केलं. पण तेव्हापासून या दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नाही असं चित्र आहे. सातत्याने भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रत्युत्तर करत असतात. भाजपाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या सरकार पडणार असल्याच्या दाव्याला शिवसेनेकडून वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं जातं. सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असणारे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपावर अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टीका केली आहे.

“दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. तुम्ही संजय राऊतांवर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात गांजा पिकणं शक्य नाही”

“महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांदी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही”, असा दावा यावेळी संजय राऊतांनी केला.

मी समजू शकतो, की राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात आम्ही खटपटी आणि लटपटी केल्या. त्याला यश आलं. सरकार पाडण्यासाठी ज्यांनी पहिल्या दिवसापासून खटपटी-लटपटी केल्या, त्यांना अपयश आलं. राज्यात पुलोदनंतर असा प्रयोग पहिल्यांदाच घडला. आत्ताचं सरकार पुलोदचीच प्रतिकृती आहे. पुलोदचे नेते शरद पवार होते. आता देखील शरद पवार यांचं मार्गदर्शन, उद्धव ठाकरेंचा भक्कम पाठिंबा, गांधी परिवाराचं असलेलं पाठबळ यातून हे सरकार निर्माण झालेलं आहे, असं राऊत म्हणाले.

देशात सर्वोत्तम चालणारं सरकार कुठलं असेल, तर…

“देशात उत्तम चाललेलं सरकार कुठलं असेल, तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे. कुणी कितीही फडफड आणि बडबड करू द्या. त्या कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची तुटून जातील. पण हे सरकार मजबूत आहे”, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut mocks bjp on ed income tax inquiry mahavikasaghadi government pmw

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!