scorecardresearch

“एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का?” संजय राऊतांचा खोचक सवाल; म्हणाले, “आधी मिंधे गटानं…”

संजय राऊत म्हणतात, “गायीनं दूध देणं थांबवलं, तर तिचं गोमांस खायला काहीच हरकत नाही असं सावरकर म्हणाले होते. मिंधे गट, भाजपाला ते मान्य आहे का?”

sanjay raut cm eknath shinde savarkar
संजय राऊतांचा भाजपा-शिंदे गटाला खोचक सवाल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छत्रपती संभाजीनगर अर्थात पूर्वीचं औरंगाबाद गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिलं आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये झालेला हिंसाचार राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा विषय ठरला आहे. त्यापाठोपाठ त्याच संभाजीनगरात आता एकीकडे महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत असताना दुसरीकडे भाजपा आणि शिंदे गटाकडून सावरकर सन्मान यात्रा काढली जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या सावरकर सन्मान यात्रेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

“सभा शांततेत पार पडेल”

संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मविआच्या सभेत गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सभा शांततेत पार पडेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “उद्धव ठाकरे सभेला जाणार आहेत. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, स्थानिक नेते उपस्थित असतील. मविआची ही सभा आहे. उगाच व्यासपीठावर गर्दी करायची नाही”, असं म्हणत राऊतांनी आपण सभेला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, “लोक प्रमुख नेत्यांचं भाषण ऐकतील. प्रचंड गर्दी होईल असं चित्र आहे. सभा शांततेत पार पडेल. सभेची तयारी पूर्ण झाली आहे”, असंही ते म्हणाले.

“..तर सत्ताधाऱ्यांच्या यात्रेचं स्वागत”

“सावरकरांनी या देशाला एक दिशा दिली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला. भाजपा म्हणतंय की गाय गोमाता आहे. सावरकरांना ते मान्य नव्हतं. गाय उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर तिचं गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपाला मान्य आहे का?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“धर्मराजा सांग.. अदानींच्या कंपनीत २० हजार कोटी कुणी गुंतवले?” संजय राऊतांचा मोदींना टोला; महाभारतातील ‘त्या’ प्रसंगाचा केला उल्लेख!

“शिंदेंनी आधी आपली दाढी काढावी”

“सावरकरांनी शेडी-जाणव्याचं हिंदुत्व स्वीकारलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नव्हतं. मग शिंदे दाढी काढणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. मग कुणीही असो. मग आता डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे. तुम्ही सावरकरांची विचारयात्रा काढताय. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलंय का?” असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

“तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही”

“मिंधे गटानं आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं. त्यांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी ब्रिटनमध्ये मदनलाल धिंग्रांबाबत जे विधान केलं आहे, मॅक्झिम गॉर्कीचं साहित्य त्यांनी इंग्रजीतून मराठीत केलं आहे, माझी जन्मठेप, सहा सोनेरी पानं, इतर विज्ञानवादी लिखाण या सगळ्या लिखाणाचं डॉ. मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांनी पारायण करावं आणि मग त्यांच्या विचारांसाठी सावरकर यात्रा काढावी. भाजपालाही सावरकर विचारांचं पारायण करायची गरज आहे. तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:29 IST

संबंधित बातम्या