मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात तापू लागला आहे. मनसेनं भोंगे उतरवण्याच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. तर सत्ताधारी पक्षांनी त्यावर तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरेंनी यासंदर्भात ३ मे रोजीचा दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रातून शिवसेनवर, विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यावरून आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी राज ठाकरेंनाच खोचक शब्दांत सल्ला दिला आहे. तसेच, भाजपाचं नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे.

“याचा फैसला जनतेसमोर होऊनच जाऊ दे”

या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बैगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे”, असं आव्हानच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करताच राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “इतिहास माहिती नसेल तर पुन्हा…!”

राऊत म्हणतात, “…तर महाराष्ट्रावर उपकार होतील!”

दरम्यान, याविषयी बोलताना संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “हे अत्यंत बकवास विधान आहे. त्या विधानाचा अर्थ कुणाला कळतो का? सर्व भोंगे बंद व्हायला हवेत म्हणजे काय? मंदिरांवर स्पीकर लावतो आम्ही. रात्रभर गावागावात भजन-कीर्तन सुरू असतं. ते बंद करायचं का? जरा डोकं ठिकाणावर ठेवून यावर वक्तव्य केलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील. सर्व भोंगे बंद करा असं बाळासाहेब कधीच बोलले नाही. राज्यात, देशात सर्व धर्मीयांचे काही ना काही कार्यक्रम सुरूच असतात. तुम्हाला ते बंद करायचे आहेत का? तुमचे जे मास्तर आहेत, जे तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देत आहेत त्यांची डिग्री तपासून घ्या. ती डिग्री बोगस आहे का? ते तुम्हाला हिंदुत्वाचे चुकीचे धडे देत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी…”, राज ठाकरेंनी अल्टिमेटमवर जाहीर केली भूमिका!

समान नागरी कायद्यावरून टीका

“जर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जात नसेल, तर समान नागरी कायद्याची भाषा कशासाठी करायची? न्यायालयाच्या सूचनांचं पालन धर्माच्या पलीकडे जाऊन करावं यासाठी आम्ही समान नागरी कायद्याची मागणी करत आहोत. धर्माच्या वर न्यायालय, कायदा आहे. आम्ही पालन करतो, इतर धर्मीय पालन करत आहेत. जर कुणी त्यात चिथावणीखोर भाषण करत असेल, तर ते समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे. फक्त राजकीय स्वार्थासाठी कुणी अशी भाषा करत असेल आणि केंद्रात सत्तेत बसलेला पक्ष अशा चिथावणीखोरांना बळ देत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. राज्य नव्हे, देश अशा प्रकारांमुळे अशांत होईल”, असं राऊत म्हणाले.