राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप करत चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचाराबाबत नवी प्रकरणं समोर आणली जात आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नवा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संशयास्पद देणग्या घेतल्याचा आरोप केला आहे.

“महात्मा किरीट सोमय्या जे आहेत, सतत इतरांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत असतात. धमक्या देत असतात. मी गेल्या काही दिवसांपासून त्यांचं जे युवक प्रतिष्ठान आहे, त्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये संशयास्पद देणग्या कश्या येतात? देणगीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जाते. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय चौकशी आहे. कंपन्यांवर धाडी पडणार आहे किंवा पडताहेत, अशा कंपन्यांकडून हे महाशय देणग्या उचलताहेत. हा साधा सरळ प्रकार नाही. ईडी आणि सीबीआयच्या कामाची पद्धत सध्या अशी आहे की, एखाद्या मोठ्या कंपनीवर गैरव्यवहारासंबंधी धाड पडली. तर ज्या ज्या लोकांना या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ झाला आहे. त्यांची सुद्धा चौकशी होते, किंवा त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं प्रकरण असंच आहे. आमचीही अशीच चौकशी झालेली आहे.” असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्या मेट्रो डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत गैरव्यवहार झालेले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? अशा एकूण १७२ कंपन्या आहेत.”, असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.