Sanjay Raut on Ajit Pawar Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाताबद्दल देखील विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील काल पोस्ट करत काही शंका उपस्थित केल्या. यानंतर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि अजित पवार यांचा अपघात याबाबत खळबळजनक दावे केले आहेत.
अजित पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर संजय राऊतांनी भाष्य केले आहे, “अजित दादांचा पक्ष आता पवार पाटलांचा पक्ष राहिला नाही, तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजितदादांचा पक्ष हा मराठमोळ्या चेहऱ्यांचा पक्ष होता. मूळ पक्ष शरद पवारांचा होता, जो डाके-दरोडे टाकून तो अमित शाहांनी त्यांच्या हातात दिला आणि स्वत:चं लेबल त्या पक्षाला लावलं. सुरुवातीला तो शाहांचा पक्ष होता आणि आता तो पटेलांचा पक्ष होईल, आणि अशा तर्हेने महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला,” असे संजय राऊत म्हणाले.
“अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. ठीक आहे, सत्तेसाठी एकत्र आले, त्यांच्यावरती काही संकटं भाजपानं लादली. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. ईडी-सीबीआय त्यांच्या मागे लावलं. त्यामुळे इतर राजकारणी करतात तेच त्यांनी केलं. तेवढ्यापुरतं ते भाजपाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या आणि त्यानंतर ते त्यांच्या मूळ प्रवाहात स्वगृही परत येण्याची धडपड करत होते. आणि ती करत असताना किंवा त्याआधी त्यांनी भाजपाचाच्या अजेंड्यावर कधीही काम केलं नाही, जाती पातीवर काम केलं नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला,” असे संजय राऊत म्हणाले.
अजित पवार मूळ प्रवाहात येण्याच्या विचाराशी ठाम होते, दोन्ही पक्षांमध्ये यासंदर्भातील हालचाली सुरू होत्या, हे सर्वांना माहिती होत्या. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती होत्या. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावर कोणताही बिलं फाडू नयेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
अजित पवारांच्या अपघाताबाबत संजय राऊतांना शंका
अजित पवार याच्या विमान दुर्घटनेबाबत बोलातना संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या अरोपांचा उल्लेख केला आहे. “अजित पवारांनी स्वगृही परत जाणे हा भाजपाचा पराभव होता. देशातल्या राजकारणाल कलाटणी देणारा निर्णय ठरला असता आणि भाजपाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार जे वारंवार सांगत होते की माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करेन. हे त्यांनी १५ जानेवारीला सांगितले आणि पुढच्या १० दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे, हे रहस्यमय आहे. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोया यांच्या त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावर आरोप करत नाही पण या लोकांच्या मनातील शंका आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.
“अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, ते मी वाचले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतो आणि त्याच्याबरोबर कोणीही प्रमुख व्यक्ती नाही, विमानाचं मेंटनन्स सर्टिफिकेट नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका येणार आहेत, माझ्या मनात देखील पहिल्या दिवशीच शंका आली. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन तेव्हाच माझ्या मनात धस्स झालं. य़ाचा अर्थ असा होता की अजितदादांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे,” असेही राऊत म्हणाले.
सरकारमधील एक उपमुख्यमंत्री उघडपणे सांगतो की यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे, यांनी त्या वेळेला १९९५ च्या काळामध्ये काही कोटी रुपये सिंचन प्रकल्पाचे बजेट वाढवून ते कसं पक्ष निधिमध्ये कसे वळवलं हे जेव्हा अजित पवार सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहात होतो तेव्हा मला स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जायचं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

