Sanjay Raut Bodh Kirtan Book PM Modi Vijay Mallya praise: शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईतील दादर येथे झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय राऊत यांना आजवर आलेले अनुभव, त्यांना भेटलेली माणसे, त्यांनी वाचलेले साहित्य याचा संग्रह बोध कीर्तन या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच तुरुंगात असताना कोणकोणते अनुभव आले, याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र पुस्तकात विजय मल्ल्या आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक असल्याची माहिती समोर आली. यानंतर आता संजय राऊत यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले.
माध्यमात आलेल्या वृत्तानुसार या पुस्तकात ‘मल्ल्याची गोष्ट’ शीर्षकाखाली संजय राऊत यांनी लिहिले, “विजय मल्ल्या फ्रॉड कधीच नव्हते. देशातील औद्योगिक क्षेत्रातला ते महत्त्वाचा अध्याय आहेत. त्यांचे आणि माझे अनेकदा संबंध आले.” संजय राऊत यांच्या या उल्लेखानंतर पुस्तकाबद्दल चर्चा होत असतानाच आता त्यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे.
प्रकाशन सोहळ्यात याबाबत बोलताना ते म्हणाले, विजय मल्ल्याच्या व्यतिरिक्त अनेक किस्से या पुस्तकात आहेत. मात्र माध्यमांनी फक्त मल्ल्याचा भाग उचलला. मी तुरुंगात असताना मला ज्या कोठडीत ठेवले होते. त्याच्या बाजूलाच दोन बीएचकेंची एक सुंदर कोठडी होती. आम्ही तुरुंग अधीक्षकांना अनेकदा बोलायचो की, आम्हाला तिथे टाका. पण ती कोठडी विजय मल्ल्यासाठी राखीव असल्याचे त्यांनी सांगितले. नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची शक्यता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला दाखविण्यासाठी ही तजवीज करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे विजय मल्ल्यावर लिहावे, हे तेव्हापासून वाटत होते.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक का केले?
या पुस्तकात पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याच्याही बातम्या समोर आल्या. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मोदी माझे शत्रू नाहीत. त्यांचे एक भाषण मी तुरुंगात असताना ऐकले. ते मला प्रचंड आवडले. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करत असताना मोदी प्रभू श्रीरामावर खूप छान बोलले होते. मी तुरुंगात ते भाषण ऐकत असताना टिपण काढले होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी बोलत असताना त्यांच्यासमोर टेलिप्रॉम्प्टर नव्हता. त्यामुळे त्यांनी हे उस्फुर्त भाषण केलेले असावे. हे अराजकीय भाषण त्यांचे आतापर्यंतच्या चांगल्या भाषणापैकी एक आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख मी या पुस्तकात केला. पण लोकांना वाटले मी त्यांची स्तुती केली.
पुस्तकाचे नाव बोध कीर्तन का?
हे पुस्तक लिहिण्यामागे माझ्या मुलींचा सल्ला कारणीभूत आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. मी तुरुंगात असताना बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्याचा संग्रह करावा, अशी कल्पना मला मुलींनी सुचवली. त्यातून हे पुस्तक आकारास आले. मला झालेला बोध मी या पुस्तकात मांडला आहे. तसेच प्रत्येक चांगला वक्ता हा एक कीर्तनकारच असतो, असेही ते म्हणाले. त्यामुळेच या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवल्याचे संजय राऊत म्हणाले.
