Sanjay Raut statement on school onion garlic ban controversy : जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड पूर्वेतील भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पालकांच्या व्हॉट्सॲप समूहावर संदेश पाठविण्यात आला असून, पर्युषण काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण आणि बटाटा न वापरता खाद्यपदार्थ देण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. यावरून वाद निर्माण झाला असून हा प्रकार लव्ह जिहादपेक्षाही गंभीर असल्याचं शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.
सरकारला हे महाराष्ट्र धर्मावरील आक्रमण मान्य आहे का?
“मिरा रोड येथील ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने आपल्या पोर्टल व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पालकांना एक परिपत्रक पाठवलं, त्यानुसार पर्युषण काळात (८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा बीट यांसारखे जमिनीखाली उगवणारे (कंदमूळ) पदार्थ आणू नयेत, असे आदेश दिले आहेत. ही शाळा भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांची आहे. फडणवीस यांच्या मंत्री मंडळात जे तथाकथित हिंदू धर्माभिमानी वैगरे आहेत त्यांना महाराष्ट्र धर्मावरील हे आक्रमण मान्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लव्ह जिहादपेक्षा भयंकर प्रकार
ते पुढे म्हणाले, “हा प्रकार लव्ह जिहादपेक्षा भयंकर आहे! मुंबईत मराठी माणसाने राहायचे का नाही ते हेच लोक ठरवणार? काय खायचे आणि नाही खायचे ते सुद्धा हे लोक ठरवणार? मुंबईतले गणपती उत्सव हे ताब्यात घेणार? १०६ मराठी जनांच्या बलिदानातून मिळवलेला हा महाराष्ट्र लिलावात काढला काय?” असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिरा भाईंदर शहरात जैन समाजाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे पर्युषण काळात पालिकेकडून दोन दिवस मांस विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.यात मिरा रोड येथे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांची सेवेन स्क्वेअर अकॅडमी ही शाळा आहे.दरम्यान या शाळेत पर्युषण काळात प्राणीहिंसा टाळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या डब्यात कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना विनंती करण्यात आली आहे.
या आवाहनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहाराचा विषय चर्चेत आला आहे. शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप समूहावर पाठविण्यात आलेल्या संदेशात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे पदार्थ डब्यात न आणण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत शाळेच्या कॅन्टीनमध्येही त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
