राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे.
या बंडखोर खासदारांपैकी चार जण दिल्लीत दाखल झाल्याचं बोललं जात आहे. हे खासदार आता लवकरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यांना एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती यावेळी ते ओम बिर्ला यांच्याकडे करण्याची शक्यता आहे.
या ‘ऑपरेशन टायगर’वरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत बंडखोर खासदारांना मोठा इशारा दिला आहे. ‘प्रत्येक गोष्टीचा हिशेब केला जाईल’, असं म्हणत संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांची पोस्ट काय?
“नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरतं. ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जातं. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्याएवढी किंमत ‘ठाकरे नावा’मुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशेब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळविला ऑपरेशन टायगर का म्हणता?”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘शिवसैनिक यांना सोडणार नाहीत’
“मीडियाची कमाल आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीत उद्योग समितीच्या बैठकीसाठी निघाले आहेत आणि इकडे बातम्या वेगळ्याच दाखवत आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे म्हणाले की, मी हिंगोलीत आहे, पण हे लोक माझी खोटी सही करू शकतात. आता हे जे लोक आहेत, त्यांना यावेळी जनता आणि शिवसैनिक सोडणार नाही, हे नक्की”, असा इशारा संजय राऊत यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचं ओम बिर्लांना पत्र
ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार आणि संसदीय गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना अधिकृत पत्र सुपूर्द केलं आहे. या पत्रात पक्षाने खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत.
१) एकमेव अधिकृत पक्ष म्हणून मान्यता : संसदेत केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षालाच मूळ आणि अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली जावी.
२) बंडखोर गटाला मान्यता नको: पक्षातून बाहेर पडू पाहणाऱ्या कोणत्याही आमदारांच्या, खासदारांच्या किंवा स्वतंत्र गटाला कोणतीही वेगळी ओळख, विशेष दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार मंजूर करण्यात येऊ नयेत.
३) ठाकरे गटाची बाजू ऐकून घ्यावी: जर भविष्यात एखादा गट किंवा खासदार वेगळ्या मान्यतेसाठी अध्यक्षांकडे गेला, तर ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये.
Earlier today, following the instructions of our Hon'ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji: pic.twitter.com/mR55DbHYvx
— Arvind Sawant (@AGSawant) June 16, 2026
‘मी उद्धव ठाकरेंबरोबरच…’, राजाभाऊ वाजे यांनी काय म्हटलं?
दरम्यान, बंडखोर ६ खासदारांमध्ये राजाभाऊ वाजे यांचंही नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी संवाद साधून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “मी एका बैठकीसाठी दिल्लीत आलो आहे. मी कोठेही जाणार नाही, मी उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. आम्ही सर्व बरोबर आहोत आणि राहू असं मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मला एकनाथ शिंदेंनीही संपर्क केला नाही. माझ्याशी संपर्कच झाला नाही, त्यामुळे १५ कोटीची ऑफर कोण देईल? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहीन”, असा खुलासा राजाभाऊ वाजे यांनी केला आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना सुरुवात कशी झाली?
शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांना उधाण आलं. “कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टर जशी तपासणी करतात आणि ती पूर्ण झाल्यावर शस्त्रक्रिया करतात, तशीच काहीशी स्थिती आता ऑपरेशन टायगरची झाली आहे. ६ खासदार आणि १६ आमदार आमच्या संपर्कात असून हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात असून पावसाळी अधिवेशनापूर्वीही ती पूर्ण होऊ शकते. आम्ही फक्त अंतिम हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहत आहोत,” असं विधान कृपाल तुमाने यांनी केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांकडून अशा प्रकारचे दावे सातत्याने केले जात होते.
ठाकरे गटातील फुटीच्या चर्चांना शनिवारपासून सुरुवात झाली होती. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ‘ऑपरेशन टायगर’ जवळपास पूर्ण झालं असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेताच ते अंमलात आणलं जाऊ शकतं, असा दावा शनिवारी केला होता. त्यानंतर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी विरोधी गटातील अनेक नेते आधीच सत्ताधारी शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. लवकरच आणखी काही नेते शिंदे गटात प्रवेश करतील, असही त्यांनी नमूद केलं होतं. मंगळवारी मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या चर्चांना दुजोरा देताना विरोधी पक्षातील आमदार खासदारांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे २४ तास खुले असल्याचं विधान केलं होतं.
