दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना २०१९मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लढवण्यात आले होते. खुद्द पंकजा मुंडेंनीही यावरून नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांच्यावर मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नुकतंच त्यांनी दिल्लीत रासपच्या कार्यक्रमात केलेल्या एका विधानावरून पुन्हा एकदा त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी त्यांना राजकारणातून निवृत्त व्हायचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पंकजा मुंडेंनी बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पक्ष खूप मोठा आहे". याशिवाय, "आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला", असंही त्या म्हणाल्या. तसेच, "रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन", असंही त्यांनी म्हटलं. "गोपीनाथ मुंडेंनी भाजपा उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं" पंकजा मुंडेंच्या या विधानांचा राजकीय अर्थ काढला जात आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे. "पंकजा मुंडे भाजपामध्ये आहेत. पण भाजपा त्यांना आपलं मानत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भाजपा उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलंय. त्यांनी महाराष्ट्र भाजपाला आजचे दिवस दाखवले", असं संजय राऊत म्हणाले. “महादेव जानकरांनी लग्नच केलं नाही हे खूप चांगलं काम केलं, त्यामुळे…”, पंकजा मुंडेंची मिश्कील टिप्पणी; उपस्थितांमध्ये एकच हशा! "पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला, हे…!" "गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, महादेवराव शिवणकर अशा बहुजन समाजातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपा शून्यातून उभा केला. शिवसेनेशी युती करून हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे परिवाराचं राजकारणात अस्तित्व राहू नये, यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे", असं संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं. "अन्याय होतो या रडगाण्याला कुणी विचारत नाही" "आम्हाला मुंडे परिवाराविषयी कायम आस्था आणि प्रेम राहील ती गोपीनाथ मुंडेंमुळे. ते असते, तर शिवसेना-भाजपा युतीला वेगळी दिशा मिळाली असती. आजचं चित्र दिसलं नसतं. पण गोपीनाथ मुंडे नसल्यामुळे त्यांच्या परिवाराची राजकारणात वाताहत केली जात आहे. अशा परिस्थितीत परिवाराच्या प्रमुख लोकांनी हिंमतीनं, साहसानं निर्णय घेण्याची गरज असते. परिणाम काय होतील, याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात. तरच तुम्ही राजकारणात टिकून राहू शकता. नाहीतर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. आमच्यावर अन्याय होतोय, अशा रडगाण्याला कुणीही विचारत नाही", असा सल्ला यावेळी बोलताना संजय राऊतांनी दिला.