anjay Raut on Shiv Sena reunion updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड वाद झाले. अखेर, हे वाद संपुष्टात येऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. मात्र, ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. यामध्ये शिवेसना (एकनाथ शिंदे) पक्षाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा सुपूत्र समीर सत्तार यांचाही समावेश आहे. एकीकडे उमेदवारीवरून गोंधळ सुरू असतानाच अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीकास्र डागलं आहे. त्यांनी भाजपावर पक्षफोडीचा आरोप केल्याने राजकारणात खळळ माजली आहे. यावरूनच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

शिवसेना पक्ष तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हात तोडायचे, पाय तोडायचे असं हळूहळू सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी आज केला होता. या दाव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “आमचं तर मुंडकंच तोंडून टाकलं. अनेक वर्षांची असलेली आमची जिल्हा परिषद गेली. महापालिकेतील सत्ता संपली. आता राहिलं काय? लहान मोठ्या जागांवर भाजपा जागा बळकावत आहे. शिवसेनेत दोन भाग करायचे, एकाला हाताशी धरायचं आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा. दुसऱ्याला धरायचं अन् तिसऱ्यावर अन्याय करायचा. अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊ आम्हाला संपवत असेल तर त्याला इलाज नाही. “

दरम्यान, अंबादास दानवे यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, असंही आवाहन केलं होतं. त्यावर अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं की, “मलाही वाटतं की आता दोन्ही शिवसेना पक्षांनी एकत्र यायला हवं. आमच्या नेत्यांनी, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. एका मिनिटांत आम्ही तयार होऊ. माझा नेता जो निर्णय घेईल, तो मला पूर्णपणे मान्य असेल”, असे त्यांनी यावेळी म्हटले.

संजय राऊतांचं आवाहन काय?

दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं, या अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भाजपाबरोबर का गेलात? भाजपा जर संपवतेय तर मग तुम्ही आणि तुमचे नेत्यांनी भाजपाबरोबर भाजपाचे घरगडी म्हणून राहण्याची भूमिका का स्वीकारलीत? भाजपाबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे”, असं म्हणत त्यांनी दोन्ही पक्ष एकत्र आणण्यासाठी चर्चेचे दारही उघडे केले. ते म्हणाले, “पण एक आहे, ज्यांना पश्चाताप झाला असेल, तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी (उद्धव ठाकरेंशी) चर्चा करावी.”

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावरून एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्त्वाचा विचार घेऊन चाललोय, आमची घोडदौड अशीच सुरू राहिल”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मूळ प्रश्नालाच बगल दिली.