Sanjay Raut on Shivsena UBT Future Alliance : आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष युती करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील असे दावे केले जात आहेत. दोन्ही नेत्यांचे चाहते, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या क्षणाची वाट पाहत असतानाच अलीकडेच दोन्ही नेत्यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्ये केली होती. मात्र, ही चर्चा पुढे सरकलेली दिसत नाही. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मात्र, मराठी माणसाच्या मनात जे आहे ते घडू शकतं असा दावा करत आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना या विषयावर मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मविआबरोबर मैदानात उतरणार की पक्षाला मनसेबरोबर युती करण्यात स्वारस्य आहे? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारल्यावर राऊत म्हणाले, “शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमच्या प्रश्नांवर लवकरच उत्तरं देतील. या विषयावरील तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन करतील”.
“मुंबईत पक्षाने वेगळा निर्णय घ्यावा असं आपल्या काही कार्यकर्त्यांना वाटतं”
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत त्या जाणून घेणं महत्त्वाचं असून आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत. ठिकठिकाणी कार्यकर्ते कोणाबरोबर जायला पाहिजे, कोणाबरोबर नको याबद्दल सुचवत आहेत. काही ठिकाणचे कार्यकर्ते म्हणतात काँग्रेसबरोबर जाऊ, काही म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊ. तर, मुंबईत पक्षाने वेगळा निर्णय घ्यावा असं आपल्या काही कार्यकर्त्यांना वाटतं. यासंदर्भातील आमचं काम पूर्ण झाल्यावर, आमचा विचार व भूमिका ठरल्यावर लवकरच आम्ही तुम्हाला (प्रसारमाध्यमं) याबाबतची माहिती देऊ.
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “आता प्रभाग समित्यांची संरचना करण्याचं काम चालू आहे. हे काम पूर्ण होण्याआधीच आमचं सर्वकाही ठरेल”. दरम्यान, यावेळी राऊत यांना विचारण्यात आलं की मनपा निवडणुकांसाठी मनसे ही शिवसेनेची (ठाकरे) प्राथमिकता असू शकते का? त्यावर खासदार राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे हे लवकरच तुमच्या या सर्व प्रश्नांना उत्तरे देतील. अगदी सविस्तर, भक्कम व परखड भूमिका सांगतील. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी उत्तरांची तयारी केली आहे”.