Sanjay Raut targets Shrikant Shinde medical degree qualification : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं. या पदी त्यांची आज बिनविरोध निवडही झाली. दरम्यान, सहा खासदार सोडून गेल्यानंतर सचिन अहिरांनीही पाठ फिरवल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर तोफ डागली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “सचिन अहिरांना सर्व काही मिळालं. जे सहा खासदार सोडून गेले, त्यांनाही सर्व मिळालं. एकनाथ शिंदेंना पक्षातील सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी संशयास्पद आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी करिअर म्हणून त्यांना खासदार केलं. आज तोच आम्हाला अक्कल शिकवतो आहे. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेला प्रत्येकजण शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थी चालले आहेत. जे जाण्याची शक्यता होते, त्या सर्वांना सर्वाधिक लाभ दिला. माणसाची ओळख राजकारणात एका नजरेत व्हायला हवी.”
आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे
“शरद पवारांनाही सचिन अहिरांनी पुढल्या करिअरसाठी सोडलं होतं. शरद पवारांनी तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं. त्या काळात त्यांना मंत्री करणं फार मोठं साहस होतं. त्यांना म्हाडाचं अध्यक्ष केलं, त्यांना मंत्री केलं, त्यांना एनसीपीचं मुंबईतील अध्यक्ष केलं. अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला बेसावध ठेवून शिवसेनेत आले. त्यामुळे ते शरद पवारांचेही झाले नाहीत, त्यामुळे ते आमचे कसे होतील, हा प्रश्न माझ्या मनात कायम होता. तरीही त्यांच्याबरोबर माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. हे मूळ शिवसैनिक नाहीत, त्यामुळे आम्हा सर्वांना आत्मचिंतनाची गरज आहे. काल सुनील शिंदे म्हणाले ते बरोबर आहे. आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
समाधानी राहणं मोठा संस्कार
“पक्ष हा मूळ शिवसैनिकच वाढवतो. बाकी सर्व वाऱ्यावरची वरात आहे, येतात-जातात. आता सचिन अहिर म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो. सुनील शिंदेंनी त्यांचा पराभव केला होता तेव्हाच त्यांचा राजकीय पराभव झाला होता. कारण, सुनील शिंदेंविरोधात टिकणं त्यांना शक्य नव्हतं. आदित्य ठाकरे दोनवेळा आमदार झाले. या काळात त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं. त्यांना उपनेता केलं, भारतीय कामगार सेनेचं अध्यक्ष केलं. संपूर्ण पुणे जिल्हा दिला. अजून काय द्यायला हंव होतं? माणसाने समाधानी राहणं हा फार मोठं संस्कार आहे”, असा टोलाही त्यांना लगावला.
