मुंबईत गुरुवारी ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात झालेल्या भाषणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिन्ही नेत्यांनी आपल्या खास शैलीत भाषणं करत जोरदार राजकीय टोलेबाजी केली. मात्र, हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चांनाही उधाण आल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलं. तसेच यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एका व्यासपीठावर आल्याच्या कार्यक्रमाचा संदर्भही दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“माझं कोणाशीही भांडण नसतं. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरही माझं भांडण नाही. अमित शाह यांच्याबरोबर देखील माझं भांडण नाहीये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही माझं भांडण नाहीये. मात्र, आम्ही लढत राहू. आम्ही आमच्या प्रश्नांसाठी, आम्ही आमच्या विचारांसाठी लढत राहू.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’ : राऊत
“आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मते आणि भूमिका मांडून लोकशाही मार्गाने लढण्याचा अधिकार आहे, त्यानुसार आम्ही लढत आहोत. गेले २५ वर्ष आम्ही एकत्र होतो आणि आजही आहोत. काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र होते. एकत्र होते, छान गप्पा झाल्या आणि अतिशय चांगली भाषणंही झाली. हा ओलावा असतो आणि ठेवायलाही पाहिजे. कारण २५ वर्ष आम्ही एकत्र होतो. भविष्यात काय होईल सांगता येत नाही”, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
“राजकारण हे अतिशय चंचल आहे आणि बहुमत त्यापेक्षा जास्त चंचल आहे. लोकांचं मन चंचल आहे, जर लोकांचं मन चंचल नसतं तर आताच्या पदवीधर निवडणुकीत निकाल असे लागले नसते. तुम्ही लोकांना एकाच विचाराला बांधून ठेवू शकत नाही. लोकशाही म्हणजे बदल आणि परिवर्तन आहे. सत्तेवर कायम कोणी राहू शकत नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
“या कार्यक्रमाच्या आधी मलाही अनेक लोकांनी विचारलं की तुम्ही या कार्यक्रमाला जाणार का? तुम्ही त्या व्यासपीठावर असणार का? संजय राऊत तिकडे असतील, मग तुम्ही तिकडे असणार का? मी त्यांना सांगितलं की, मी दाऊद बरोबर बसू शकत नाही, पण राऊत बरोबर बसू शकतो”, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
