राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिल्याची राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरुन भाष्य केलेलं असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना आधी शाब्दिक चिमटा काढला आणि नंतर फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

नक्की वाचा >> “२०१९ मध्येच भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर…” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “आम्ही कुठे…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांना, “देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीवर काय सांगाल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “यावर मी कसं काय बोलणार? भाजपाने निर्णय घेतलाय त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा. मला अजून फडणवीसांबद्दल बोलताना तोंडामध्ये उपमुख्यमंत्री हा शब्द येत नाही. एक तर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय. देवेंद्रजींच्या बाबतीत असं काही झालं किंवा होत असेल तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’ प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी याबद्दल…”

फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देणं हा पंख छाटण्याचा प्रयत्न वाटतो का?, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मी असं नाही म्हणणार. शेवटी कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत बसलेत. नवीन सरकार स्थापन होतंय. विधीमंडळ पक्षाची बैठक होतेय आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद स्वीकारा असा आदेश दिला जातो. आता जे मुख्यमंत्री झालेत ते त्यांच्याच मंत्रीमंडळामध्ये ज्युनियर मंत्री होते. भाजपामध्ये शिस्त आणि आदेश याचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्याचं कौतुक केलं पाहिजे,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम

नक्की वाचा >> फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की…”

यावेळेस बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदेंना पदावरुन काढल्यासंदर्भातही भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंना पदावरुन काढलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल?”, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत यांनी, “त्यात काय सांगायचं. शिस्तभंगाची कारवाई आहे, ती पक्ष प्रमुखांच्या स्वाक्षरीने झालेली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये नेते म्हणून त्यांची नेमणूक उद्धव ठाकरे यांनीच केली होती. माझी नेमणूक बाळासाहेब ठाकरेंनी केली होती फार पूर्वी. नंतरच्या कार्यकरिणीमध्ये काही नेत्यांच्या नेमणूका उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुखांच्या अधिकारात ज्या गोष्टी आहेत त्यानुसार केल्या. आणि त्याच अधिकारामध्ये त्यांनी काही नेत्यांना दूर केलं असेल,” असं उत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut praises devendra fadanvis for accepting to be deputy cm as per bjp order scsg
First published on: 02-07-2022 at 13:30 IST