अलिबाग – शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. संबंधित खासदारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पंतप्रधानांकडून त्यांना मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले जाणे हा न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत अलिबाग येथील आगरसुरे येथील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटातील सहा खासदारांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केले.गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता राऊत यांनी उपरोधिक टीका केली. “पंतप्रधान मोदींनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे. ते गद्दारांना भेटतात, चहापाणी ठेवतात. राहुल गांधी, अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना ते का भेटत नाहीत?” असा सवाल त्यांनी केला.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना संबंधितांना भेटून त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगणे योग्य आहे का, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. न्यायालयीन प्रकरणावर अशा भेटींचा परिणाम होऊ शकतो का आणि हा न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रकार आहे का, याचा विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे दिवसभर पंतप्रधानांच्या बेडरूममध्ये बसतील, त्यांचे काम काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्यांना झोप लागत नाही, असा टोला त्यांनी लगावला.एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख मोदी आणि शहा आहेत. शिंदे गट ही मोदी-शहांची कंपनी आहे. त्यामुळे त्यांना जाऊन हिशोब द्यावा लागतो, अशी टीकाही राऊत यांनी केली.
