“देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर…”; संजय राऊतांचा खोचक सल्ला

मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांवर बोलताना दिलेला.

Fadanvis Raut
फडणवीस यांनी केलेला दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा दावा

ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यामध्ये फडणवीस-मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या या वादानंतर मलिक यांच्याबद्दलचे काही पुरावे आपण देणार असल्याचं फडणवीस म्हणालेत. मलिक यांचे यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना देणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधातील पुरावे जाहीर करून बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मात्र आता फडणवीसांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेत्यांना एक खोचक सल्ला दिलाय.

“बॉम्ब लगेच फुटले पाहिजेत. नाहीतर ज्याच्या हातात आहेत बॉम्ब त्यांच्या हातातच ते फुटतात. त्यामुळे हातात बॉम्ब वगैरे असतील तर ते डिस्पोज करा. कोणाकडे बॉम्ब असेल असं राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळतायत,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी या राजकीय बॉम्बबद्दल बोलताना दिलीय. त्याचप्रमाणे, “ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर त्यांनी फोडावा ना दिवाळी संपायची कशाला वाट पहायची,” असं यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले आहेत.

फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केलाय त्यावरही राऊत यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलंय. “या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधले १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत. कोल्हापूरातून कोणं आलं आहे, चेंबूरमधून कोण आलंय. कोण कोणत्या गँग चालवत होते हे मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही यामध्ये,” असं राऊत म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut react on fadanvis saying will have a exclusive revelations after diwali scsg

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या