आजपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाने शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. उद्धव ठाकरेंचे फोटो हटवल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला विविध पदांवर नेमलं. म्हणून तुम्ही गद्दारीची क्रांती करू शकलात. आता त्यांचेच फोटो विधीमंडळ कार्यालयातून काढत आहात, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…
विधीमंडळ कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवल्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “विधीमंडळातील पक्षाच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे फोटो काढले असले तरी जनतेच्या हृदयात ठाकरे परिवाराला जे स्थान आहे, ते कसं दूर करणार? हा शूद्रपणा आहे. हा हलकटपणा आहे.”
“तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इतके घाणेरडे आणि दळभद्री मनोवृत्तीचे लोक आमचे सहकारी म्हणून वावरत होते, याची आता आम्हाला लाज वाटू लागली आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.