राज्यात आमदार-खासदार फुटीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या १५ दिवसांत शिवसेनेला दोनवेळा जबर धक्के बसले. आधी ६ खासदारांनी बंड करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर, नंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेतून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आणखी एका आमदाराला २० कोटींची ऑफर दिल्याची माहिती आज संजय राऊतांनी दिली. तसंच, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही भाष्य केलं. यावेळी त्यांनी टॉलस्टॉयच्या गोष्टीचाही संदर्भ दिला.
संजय राऊत म्हणाले, “टॉलस्टॉयची गोष्ट सर्वांसाठी आहे. माणसाने कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही, त्याचा अंत वाईट आहे. बायबल, हिंदूत्त्व, पुराणात कोणत्याही धर्मात एक तत्व आहे; तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही. तुम्ही आमदार-खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय. कालही एका लिंगाडे नावाच्या आमदाराला २० कोटींची ऑफर दिली. किती पाहिजे तुम्हाला? मग स्ट्रेसमुळे इस्पितळात जाऊन दाखल व्हावं लागतं. हे थांबलं पाहिजे”, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
ते पुढे म्हणाले, “अतिश्रमामुळे एकनाथ शिंदे आजारी असल्याचं मला कळलं. ते आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, त्यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो.”
संजय राऊतांनी टॉलस्टॉयची कोणती गोष्ट सांगितली?
संजय राऊतांनी आज टॉलस्टॉयच्या कथेवरून सत्ताधारी पक्षावर आणि मुख्यत्वे एकनाथ शिंदेंवर प्रहार केला. याबाबत त्यांनी सामनाच्या रोखठोक सदरातही लिहिलं आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रात शिंदे यांची अवस्था टॉलस्टॉयच्या कथेतील त्या हावऱ्या म्हाताऱ्यासारखी झाली आहे. ही गोष्ट बकासुरासारखी आहे. एका छोट्यागावात राहणारा म्हातारा शेतकरी, तो ‘टांगा’ चालवून उदरनिर्वाह करीत होता. नेहमीच असंतुष्ट दिसायचा. त्याच्या मालकाने त्याला कितीही दिले तरी त्याला ते कमीच वाटायचे. जे आहे ते पुरेसे नाही या भावनेने तो रात्रभर तळमळत पडायचा. इतरांची संपत्ती, जमीनजुमला पाहून तो मनातल्या मनात जळत असे. एक दिवस त्याला कळले की, बाजूच्या गावात खूप स्वस्तात जमीन मिळते. त्याने स्वतःचे गाव सोडले व तो दुसऱ्या गावात गेला. त्या गावाच्या प्रमुखांना भेटला. त्यांच्या अटी विचित्र होत्या. त्यांनी सांगितले, “एका दिवसात तू जेवढी जमीन फिरून येशील, तेवढी जमीन तुझी. फक्त सकाळी सूर्य उगवल्यावर चालायला सुरुवात करायची आणि सूर्य मावळताच इथे परत यायचं. जिथून चालायला सुरू करशील, तिथेच तू परत यायला हवं. जेवढी जमीन फिरशील तेवढी जमीन तुझी.” त्या हावरट म्हाताऱ्याला आनंद झाला. तो मनात म्हणाला, “एका दिवसात मी इतकी जमीन काबीज करीन की, इकडचा सर्वात मोठा भूस्वामी होईन.” दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच तो चालू लागला. त्याला वाटले, चालत राहिल्याने नुकसान होईल. मग तो धावत राहिला. धावण्याचा वेग म्हणजे ‘लालच’ वाढू लागली. तो चारही बाजूला सैरावैरा माथेफिरूप्रमाणे धावू लागला. आणखी हवे, आणखी हवे म्हणून तो दूर दूर धावत गेला. दुपारी त्याने जेवणही घेतले नाही. जेवणाच्या वेळेत धावून अधिक जमीन मिळवता येईल असे त्याला वाटले. सूर्य मावळला. त्याला वाटले, आपण खूपच जमीन मिळवली. आता परत मागे यावे लागेल, पण अंधार वाढला, तो घाबरला. तो परतीच्या प्रवासात धावू लागला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. घामाच्या धारा वाहू लागल्या. पाय लटपटू लागले. तरीही धावला. शेवटच्या क्षणी कसाबसा तो गावाच्या वेशीवर येऊन कोसळला, पण तो मेला होता.”
