Sanjay Raut : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे आंदोलक ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. दरम्यान, या आरोपांवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यात शिवसेनेचे ( ठाकरे गट ) पदाधिकारी असू शकतात. पण त्यांच्या आंदोलनाशी पक्ष म्हणून शिवसेनेचा संबंध नाही. ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचे होतं. आरक्षणासंदर्भात मराठवाड्यात जे आंदोलन सुरु आहे. त्यातच राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं. त्यानंतर सर्वच पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – Raj Thackeray : बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला, सुपाऱ्या फेकल्या; उबाठा गटाकडून घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
“त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही”
“मराठा आरणक्षाचं आंदोलन हे पक्षविरहित आहे. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी मोर्चे निघाले होते. तेव्हाही सर्वच पक्षाचे नेते एकत्र होते. आता बीडमध्ये शिवसेनेची ( ठाकरे गट) ताकद जास्त असेल, म्हणून आमचे नेते पुढे दिसले असतील, पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही”, असेही ते म्हणाले.
“मनसेच्या इशाऱ्यालाही दिलं प्रत्युत्तर”
दरम्यान, बीडच्या घटनेनंतर मनसेच्या नेत्यांनी ठाकरे गटाला इशारा देत राज्यात तुमचेही दौरे आहेत, तेव्हा आम्ही बघून घेऊ, अशी भूमिका मांडली होती. त्यालाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. “बीडमध्ये आंदोलन नेमकं कुणी केलं, हे आधी मनसेच्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. धमक्या इशारा आम्हाला देऊ नये, ते त्यांनी भाजपाला, फडणवीसांना आणि महाराष्ट्रद्रोह्यांना द्यावं. ते पक्ष म्हणून आमचं आंदोलन नव्हतं. पक्ष म्हणून ती आमची भूमिका नव्हतं”, असं संजय राऊत म्हणाले.