केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता विविध राजकीय चर्चादेखील सुरु झाल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“ ”केंद्र सरकारने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ज्याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते विशेषतः अशावेळी जेव्हा महाराष्ट्रात त्यांचाच राज्य आहे, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस जसं आमच्या मुलींचे रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीने आमच्या प्रमुख नेत्यांचंही रक्षण करू शकत नाही. यावर आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, असेही ते म्हणाले.
“राज्याचं पोलीस खातं भ्रष्टाचाराने बरबटलेलं”
“राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगत असतील की मी संघाची कार्यकर्ता आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? या राज्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्याप्रमाणे नेमणूक झाल्या आहेत, त्यांची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे बघूनच त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बढती आणि भरती होत नाही”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
“चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं प्रत्युत्तर”
पुढे बोलताना संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रत्युत्तर दिलं. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी अमित शाहंबरोबर चर्चा झाल्याचा दावा केला होता, तसाच ते शरद पवारांबाबतही करू शकतात, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना, “चंद्रशेखर बावनुकळे हे राजकारणातली गेलेली केस आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात भाजपा ३० हजार मतांनी मागे होता. तेव्हापासून त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. आम्हाला मुख्यमंत्री पदासाठी कुणाचाही याचना करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत जनतेच्या समोर जाणार आहोत. उद्धव ठाकरे कधीही स्वत:च्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलले नाही, ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत बोलले, कदाचित बावनकुळे यांना कानाने कमी ऐकू येतं, त्यांनी कान साफ करून घ्यावे”, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.