मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये पवार कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. तसे, संजय राऊत यांच्या भाषेवरून देखील राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. यासंदर्भाच राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर आता संजय राऊतांनी ट्वीट करून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंचां खोचक निशाणा
राज ठाकरेंनी आजच्या सभेमध्ये बोलताना पवार कुटुंबीयांसोबतच संजय राऊतांना देखील टोला लगावला. “मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
“काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ***, चु*** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं”, असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावर आता संजय राऊतांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलं आहे. “दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर त्यावर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.