sanjay raut replied to chandrashekhar bawankule objection on press conference spb 94 | Loksatta

“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडते आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडते आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळेंच्या आरोपाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या पत्रकार परिषदेमुळे असं कोणतं वातावरण बिघडलंय? हे मला बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगितलं, तर मी त्यांचे ऐकेन, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी शंभूराज देसाईंनाही प्रत्युत्तर दिलं. टीव्ही ९ वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…हे अजिबात चालणार नाही”, सीमाप्रश्नावरून सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपाला सुनावलं; लोकसभेत खडाजंगी!

काय म्हणाले संजय राऊत?

“चंद्रशेखर बावनकुळे हे आमचे चांगले मित्र आहेत. ते संयमी गृहस्थ आहेत. असं बोलण्यामागे त्यांची मजबुरी आहे. पण माझ्या पत्रकार परिषदेमुळे असं कोणतं वातावरण बिघडलं आहे? कर्नाटकला धडा शिकवा, राज्यपालांना पदावरून हटवा, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कारवाई करा, असं बोलण्याने वातावरण कसं बिघडेल? हे मला बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगितलं, तर मी ऐकायला तयार आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

हेही वाचा – ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जेलमध्ये राहिल्याने…”

“मुळात जे प्रश्न मी विचारतो आहे, तेच प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत. उदयनराजे असतील किंवा संभाजीराजे असतील, हे सुद्धा याच विषयांवर बोलत आहेत. त्यामुळे बावनकुळेंनी अभ्यास करायला हवा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राऊतांच्या ‘नामर्द सरकार’ टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले “स्वत:ला उपमा देण्याचे…”

यावेळी बोलताना त्यांनी शंभूराज देसाईंनाही प्रत्युत्तर दिलं. “मला तुरुंगात पाठवणारे तुम्ही कोण आहात? याचा अर्थ तुम्ही खोटे प्रकरणं, खोटे पुरावे तयार करत आहात. न्यायालये, कायदा, तपास यंत्रणांना दबावाखाली घेऊन आपल्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठी हे सर्व घडवलं जात आहे, हे मंत्र्यांच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे. मला जामीन देताना न्यायालयानेही हेच सांगितलं आहे”, असेही ते म्हणाले. तसेच यासंदर्भात मी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:20 IST
Next Story
Maharashtra Karnataka Dispute : ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!