मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजपाला मतचोरीसाठी मदत केली, तसं वातावरण निर्माण केलं. मतदार याद्यांमध्ये नावं घातली गेली असे सगळे आरोप राहुल गांधी यांनी केली होती. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली तेव्हा राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला आहे म्हणत त्यांचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले होते. मात्र खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मेंदू चोरीला गेला आहे असं म्हणत त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस ज्ञानेश कुमारांच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला आहे. मेंदू कुणाचा चोरला, कुणी चोरला? यापेक्षा मुद्द्यावर बोला ना. तुमचा मुख्य निवडणूक आयुक्त भ्रष्टाचारी आहे, अमित शाह याचा एजंट आहे. तुम्ही त्याची बाजू का घेत आहात? निवडणूक आयोगाने तुम्हाला वकील म्हणून नेमलंय का? तुम्ही त्यांची वकिली करत आहात म्हणजे तुम्ही काहीतरी घोटाळे करत आहात. बरं निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात फक्त राहुल गांधींनी आवाज उठवला आहे का? इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी आणली. संघाचे आणि इंडियन एक्स्प्रेसचे खूप चांगले संबंध आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल. संघ आणि इंडियन एक्स्प्रेसचे संबंध त्यांना ठाऊक नाहीत. इंडियन एक्स्प्रेसच्या संपादकांना मेंदू नाही असं त्यांना म्हणायचं असेल अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

फडणवीस शिंदे जसे फोटोसाठी एकत्र आले होते तसेच तीन निवडणूक आयुक्त फोटोसाठी एकत्र आले-राऊत

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जसे फोटोसाठी एकत्र येतात तसे तीन निवडणूक आयुक्त एकत्र आले होते. पण एकत्र येण्यासारखे त्यांचे संबंध आहेत का? तर नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. पत्रकारिता, राजकारण याबाबत आम्हाला जास्त कळतं. आम्हाला त्यांनी शिकवू नये. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत म्हणून लोक मान डोलवतात. ज्या दिवशी ते खुर्चीवर नसतील त्या दिवशी मच्छरही त्यांच्याकडे फिरकणार नाही. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे तर लोकांनी खर्च कमी करावा असं म्हणाले आहेत. म्हणजे काय? लोकांनी खर्च कमी करायचा. माझ्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार कमी करावा असं देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांना का सांगितलं नाही? तसं जर ते म्हणाले असते तर मी मान्य केलं असतं की त्यांना मेंदू आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.