Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती महापालिका निवडणुकांची आणि त्या अनुषंगाने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची. राज ठाकरेंच्या ‘टाळी’ला उद्धव ठाकरेंनी हाळी दिली. ज्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी ताज लँड्स एंड या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे युतीसाठी सकारात्मक आहेत. दरम्यान याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मदारी असं म्हटलं आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा
राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसह असलेले वाद विसरुन मी महाराष्ट्र हितासाठी बरोबर जायला तयार आहे या आशयाचं एक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसादही दिला. दरम्यान मध्यंतरीच्या काळात या चर्चा थांबल्या होत्या. मग जून महिन्यात या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. उद्धव ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी आता निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे असं म्हणत तो चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची अचानक भेट झाली. या भेटीचे विविध अर्थ लावले जात आहेत. अशातच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना मदारी म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच असल्या भेटींमुळे काही फरक पडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत देवेंद्र फडणवीसांबाबत काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस यांना वाटतं आहे की ते मदारी आहेत आणि सगळ्यांना नाचवू शकतात. पण हे नुसतं त्यांचं वाटणं आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे, पैसा आहे, बिल्डर लॉबी आहे, भ्रष्टाचार करु शकता म्हणून सगळ्यांना तुम्ही नाचवू शकता ही तात्पुरती फेज आहे. पण ठाकरे ब्रांड हा मुंबई आणि महाराष्ट्राचा ब्रँड आहे. मोदी-शाह असोत किंवा देवेंद्र फडणवीस कुणीही हा ब्रँड संपवू शकत नाही. ठाकरे ब्रँड अजिंक्य आहे. राजकारण सोडून द्या, लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीचा आदर आहे. कारण महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने त्याग केला आहे, संघर्ष केला आहे. त्याची तुलना कुणाशाहीही होऊ शकत नाही. मोदी, शाह आणि फडणवीस यांनी कितीही मोठी बिल्डर लॉबी आणली आणि पैशांचे डोंगर उभे केले तरीही या ब्रँडशी तुलना करु शकत नाही हे सत्य आहे. विधानसभा निवडणूक लांड्यालबाड्या करुन जिंकलात. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने तिच तयारी सुरु आहे पण लोक सूज्ञ आहेत.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.