Sanjay Raut : महाराष्ट्रात २०२२ मध्ये शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पाहण्यास मिळालं. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पक्षातले ४० आमदार बरोबर घेतले आणि त्यानंतर त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. शिवसेनेत अशा प्रकारचं बंड याआधीही झालंय. पण एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेवरच ताबा सांगितला. आमची शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे हे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. या पक्षफुटीसाठी संजय राऊत जबाबदार आहेत अशा चर्चा त्यावेळीही रंगल्या होत्या त्यानंतरही रंगल्या. याबाबत प्रश्न विचारला असता आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे खूप घाबरले होते आणि मलाही बरोबर चल असं सांगत होते असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कोसळलं महाविकास आघाडी सरकार

एकनाथ शिंंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर अडीच वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या. आता त्यावेळच्या घटनाक्रमाच्या आधी संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मी आणि एकनाथ शिंदे अय़ोध्येला एकत्र गेलो होतो त्यावेळी काय घडलं ते संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊत काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे माझा अत्यंत जवळचा मित्र. तो मला सांगत होता माझ्याबरोबर चल. मी म्हटलं तू पण जाऊ नकोस, तुम्ही का जात आहात? अयोध्येला आम्ही एकत्र गेलो होतो. माझ्या खोलीत येऊन मला ते सांगत होते की आपण जाऊ. शेवटी एकनाथ शिंदे हे घाबरुनच गेले. मला ते म्हणाले माझं तुरुंगात जायचं वय नाही. आता मला नातवंडं झाली. मी म्हटलं मलाही नातवंडं झाली आहेत. पण म्हणून पक्षाने आपल्याला जे इतकी वर्षे दिलंय त्यांच्या छातीवर पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा केल्यासारखं होईल. मी तुम्हालाही सांगतो की तुम्ही जरा धीर धरा, शांत राहा. मी जेव्हा हे सांगतो तेव्हा माझ्यामुळे काय पक्ष फुटला का? हे सगळे डरपोक आहेत म्हणून गेले. डरपोक माणूस शूर माणसांवर शब्दाने हल्ला करतच असतो. आता काय परिस्थिती आहे? राजकीय माणसाला हात लावण्याची ईडीला भीती वाटते आहे. आता राजकीय स्थिती बदलली आहे. माणसांमध्ये संयम नसेल आणि मोहात वाहात गेला की हेच होतं. हे सत्तेच्या मोहात तिकडे गेले आहेत. बहुमत ही चंचल गोष्ट आहे, ती कधीच एका जागी स्थिर नसते हे यांना कळत नाही” असं संजय राऊत म्हणाले. माझा कट्टा या कार्यक्रमात पक्ष तुमच्या फुटला का? हे विचारलं असता संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर काय?

“ते (संजय राऊत) काय म्हणाले त्याबाबत त्यांनाच विचारा. मला का विचारत आहात. मी तर माझं काम करून मोकळा झालो. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून कोणाशी सोयरीक केली, जे बाळासाहेब ठाकरेंना कधीच नको होतं, त्यांच्यासोबत तुम्हा सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी गेलात, त्यामुळे आम्ही त्यावर काय बोलणार. बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावला, ते असंच खोटं बोलणार” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.