राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागण्यांसोबतच इतरही मागण्या त्यांनी लावून धरलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातली एसटी वाहतूक सध्या बंद आहे. या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कामगारांना धीर धरण्याचं आवाहन केलं आहे. मात्र कामगारांच्या प्रश्नांचा तिढा अजून सुटलेला नाही. याबद्दलच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आता भाष्य केलं आहे.

याविषयी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र सरकारने, माझ्या माहितीप्रमाणे कामगारांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनू नये. त्यांनी स्वतःचं, कुटुंबाचं, राज्याचं आणि एसटीचं हित पाहावं, असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आणि ह्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व आहे.

हेही वाचा – प्रवाशांना वेठीस धरू नका!; संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

विरोधकांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, अनिल परबांचा पुतळा जाळण्यामागे राजकारण आहे. हे पुतळे जाळण्याचं राजकारण करणारे कोण आहेत, यांचा राजकीय अजेंडा काय आहे, त्यांना कामगारांच्या मागण्यांपेक्षा, एसटीच्या संपापेक्षा, कामगारांच्या प्रश्नांपेक्षा महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार बदनाम करण्यातच जास्त रस दिसतोय. त्यांना कामगारांच्या चुली पेटाव्यात, कामगारांचे प्रश्न सुटावेत असं वाटत नाही.