Sanjay Raut on Amit Shah’s Lalbaugcha Raja Visit : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. परंतु, त्यांच्या या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई लुटण्याकरता हे केंद्रीय मंत्री मुंबईत येत असतात, असं राऊत म्हणाले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले, “अमित शाहांना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी दळभद्री राजकराण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई, महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार आणि अनेक महत्त्वाचे आर्थिक केंद्र गुजरातला नेल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाहांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. अमित शाह गृहमंत्री असले तरीही ते कमजोर गृहमंत्री आहेत.”
हेही वाचा >> Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं राज्य लयाला नेणाऱ्या पेशवाईचे..”, संजय राऊत यांची टीका
“या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळली आहे. जम्मू काश्मीर, मणिपूरमध्ये या देशातील गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. राजकारण, पक्ष फोडी, लूटमार यांना पाठिंबा देणं, मुंबई लुटणं, लुटणाऱ्याला पाठिंबा देणं अशी कामं केली जात आहेत. शिवसेना राष्ट्रवादीसारखे स्वाभीमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक फोडणे अशी कामं त्यांनी केली. महाराष्ट्र विकलांग करायचं हे त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना शत्रू मानते”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
लालबागचा राजाही गुजरातला पळवतील
“लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊद्या. मला तर सारखी भीती वाटते की ज्या प्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे ते लालबागचा राजा तर गुजरातला नेणार नाहीत ना.. ते काहीही करू शकतात. लालबागच्या राजाचं मोठं नाव आहे, देशभरातून लोक येत असतात. चला गुजरातला घेऊन जाऊयात, असं होऊ शकतं. लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव ठेवतील. व्यापारी लोक आहेत. मी तुम्हाला सांगतोय. मी फार विचारपूर्वक बोलतोय. हे लोक महाराष्ट्राला शत्रू मानत आहेत. भाजपाच्या अनेक लोकांना मुंबई लुटायची आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून पुढील दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरता ते मुंबईत येणार आहेत. गेल्यावर्षीही अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते.
© IE Online Media Services (P) Ltd