गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी चंद्रपूरला आणण्यात येईल. धानोरकरांच्या निधनाचं वृत्त कळताच राज्यासह देशभरातील नेते मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील आज (३० मे) पत्रकार परिषदेवेळी धानोरकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
खासदार संजय राऊत
हे ही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या गाठीभेटी वाढण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
संजय राऊत म्हणाले, धानोरकर यांना शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढायची होती. त्यांना उद्धवजी ठाकरे यांनी तयारी करण्याच्या सूचना आणि पवानगी दिली होती. परतु त्यांना शिवसेनेकडून लढता आलं नाही, युतीकडून लढता आलं नाही. ऐनवेळेस ते काँग्रेसमध्ये जाऊन लोकसभा निवडणूक लढले. ते राज्यातले काँग्रसेचे एकमेव खासदार होते. जरी ते काँग्रसमध्ये गेले, काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार असले तरी त्यांची जीवनशैली, त्यांचं वागणं हे शिवसेनेचं होतं. शिवसैनिक असल्याचा त्यांना शेवटपर्यंत सार्थ अभिमान होता. ते काँग्रेसकडून निवडून आले असले तरी ते शिवसेनेचे होते.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.