पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे शिवसेना अनंत गीतेंवर करणार कारवाई?; संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…

अनंत गीतेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया देत शरद पवार देशाचे नेते असल्याचं म्हटलंय.

Sanjay-Raut-Anant-Geete

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. अनंत गीतेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया देत शरद पवार देशाचे नेते असल्याचं म्हटलं होतं. तसेच महाराष्ट्रातील सरकार चांगलं चाललंय. त्यामुळे गीते सारख्या लोकांच्या वक्तव्यांची दखल घेत नाही, असंही राऊतांनी म्हटलंय.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरीही त्यांचं नाव शरद पवार यांनी सुचवलं होतं. या महाविकास आघाडी सरकारची त्यांनी पायाभरणी केली. त्यामुळे ते आमचे नेते आहेत. अनेक वर्ष आमचे त्यांच्याशी राजकीय मतभेद होते. पण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार अनेक वेळा एकाच व्यासपीठावर सोबत होते. शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, असं अनेकदा बाळासाहेबांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे पवारांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं राऊत म्हणाले.

दरम्यान, “स्थानिक पातळीवरच्या संघर्षाबद्दल गीते यांनी अशी वक्तव्ये करणं पक्षाच्या नियमात बसत नाही. गीते यांची भूमिका ही वैयक्तिक आहे पक्षाची नाही. गीतेंनी हे वक्तव्य करण्यामागे त्यांची कारणं असतील, त्यांच्या भावना असतील पण सरकारमधील एका महत्वाच्या नेत्याविषयी जाहीरपणे असं व्यक्त होणं, चुकीचं आहे. अनंत गीतेंवर कारवाई करायची की नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील,” असं राऊतांनी म्हटलंय.  

काय म्हणाले होते अनंत गीते..

“काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे.” असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut says cm uddhav thackeray will take action on anant geete statement on sharad pawar hrc

ताज्या बातम्या