इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ५० दिवसांपासून युद्ध चालू आहे. या युद्धाचे जगभर पडसाद उमटत आहेत. जगभरातले नेते या युद्धावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युद्धाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. यावर इस्रायलनेही संताप व्यक्त केला आहे. इस्रायली दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संजय राऊत यांची तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या एक्सवरील पोस्टचा कडक शब्दांत निषेध नोंदवला.
खासदार संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामधील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली होती. यासह कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होता, हे आता समजतंय का?” त्यांच्या या एक्स पोस्टवरून प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दूतावासाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राऊत त्यांची तक्रारदेखील केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
खासदार राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गाझा पट्टीत शेकडो लहान मुलांची हत्या झाली आहे. शेकडो संख्येने नवजात शिशू मारले गेले आहेत. ते पाहून मी माझी भावना व्यक्त केली होती. मी तो विध्वंस पाहून म्हटलं, ‘…म्हणूनच हिटलरने तुमचा तिरस्कार केला असेल’. नंतर मला कळलं की हे बरोबर नाही. यामुळे आपल्या ज्यू समुदायाच्या भावना दुखावल्या असतील. मग मी ती पोस्ट मागे घेतली. मी ती पोस्ट डिलीट करून बरेच दिवस लोटले. त्यानंतर आता त्यांनी पत्र लिहिलं आहे. मला वाटतंय त्यांना (इस्रायली दूतावास) कोणीतरी चावी दिली असेल.
हे ही वाचा >> “हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा विश्वप्रवक्ते…”, शिंदे गटाचा संजय राऊत यांना सवाल
युद्धाचे नियम पाळायला हवेत : राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, इस्रायली दूतावासाला पत्र लिहू द्या. इस्रायल हा वर्षानुवर्षे भारताचा मित्र राहिला आहे. मी इस्रायलच्या भावनांचा आदर करतो. मी माझ्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं? ज्या पद्धतीने गाझातल्या रुग्णालयांवर सातत्याने बॉम्बहल्ले होत आहेत. त्यामुळे तिथले लोक, रुग्ण मारले जात आहे. रुग्णालयांमधील नवजात शिशूंना दूध आणि पाणीसुद्धा मिळत नाहीये. हे सगळं चुकीचं आहे. युद्धाचे काही नियम ठरलेले आहेत. महाभारताच्या काळापासून, त्याही आधीपासून युद्धाचे नियम बनलेत, आपण त्या नियमांचं पालन करत आलो आहोत. इस्रायलनेही युद्धाचे नियम पाळायला हवेत.
