CJP ने जे आंदोलन पेपरफुटीविरोधात उभं केलं होतं, त्यामुळे मोदी सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. शिक्षण मंत्री पदी कुणाची वर्णी लागणार? याच्या चर्चा सुरु असतानाच खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठा दावा केला आहे.
संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले?
“या देशात जी राजकीय उलथापालथ झाली आणि मोदींची नाचक्की झाली ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळे. १२ वर्षांत पहिल्यांदाच एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. या देशातला विद्यार्थी आणि तरुण इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत जंतर-मंतरसह देशभरात रस्त्यावर उतरुन आंदोलन करायला लागला तो शिक्षण खात्याच्या कारभाराविरोधात. शिक्षण खातं हे कुठल्याही देशासाठी तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं. तिथेच वाळवी लागली. मोदींना माघार घ्यावी लागली. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या मनात असं आहे की या खात्यासाठी एक उच्चशिक्षित, प्रशासक असलेला नेता नेमावा. या क्षणी देशात उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकेल तर ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे नरेंद्र मोदींनाही माहीत आहे.” असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीतली माझी ही माहिती आहे त्यानुसार…
पुढे संजय राऊत म्हणाले, की दिल्लीतली जी माहिती आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय तुम्ही सांभाळा. हे खातं पहिल्या पाच खात्यांमधलं हे खातं आहे. या खात्याची जबाबदारी घ्या असं देवेंद्र फडणवीसांना मोदींनी सांगितलं आहे अशी माझी माहिती आहे. कुणी कितीही इन्कार केला तरीही माझी माहिती पक्की आहे. असंही संजय राऊत म्हणाले.
फडणवीस दिल्लीत गेले तरीही…
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही. कारण भाजपात अशी परंपरा आहे सध्याची की दिल्लीतूनच राज्यांचा कारभार चालवायचा. गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत माहीत आहे का? राजस्थानचे मुख्यमंत्री कोण ते माहीत आहेत? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं नाव माहीत आहे का? कमीत कमी कार्यक्षम असतो त्याला शोधून भाजपा पदावर बसवते. माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी फडणवीसांना आश्वासन दिलं आहे की तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री बसवला जाईल. या देशाला एक उत्तम शिक्षण मंत्री मिळावा ही आमची इच्छा आहे आणि ती बहुतेक सरकारचीही इच्छा आहे. आता देवेंद्र फडणवीस काय विचार करतात ही त्यांची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
