राज्यात गेल्या दोन दिवसात काही ठिकाणी दोन गटांमध्ये राडे होणं, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री २ च्या सुमारास मोठा राडा झाला. येथी किराडपुरा भागात जमावाने पोलिसांच्या गाड्या आणि खासगी वाहनांची जाळपोळ केली. तसेच अनेक ठिकाणी दगडफेक केली. मुंबईतल्या मालवणी परिसरात देखील काल रात्री तणाव निर्माण झाला होता. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले की, अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली. परंतु दोन्ही धर्माच्या (हिंदू-मुस्लीम) लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली, दंगल होऊच द्यायची नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली, त्यामुळे अनर्थ घडला नाही. परंतु २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ती सभा होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये यासाठी अशा प्रकारचा तणाव निर्माण केला जात आहे.

राऊत यांनी राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केला आहे की, आमची सभा रोखण्यासाठीच सरकारचं हे दंगलींचं कारस्थान आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, काल रात्री मुंबईच्या मालवणी परिसरात देखील चकमक झाली. यापूर्वी कधी राम नवमीच्या शोभायात्रेवर हल्ले झाले नव्हते. गुढीपाडव्याच्या इतक्या शोभायात्रा निघतात. परंतु तिथे कधी असा तणाव निर्माण झाला नव्हता. परंतु शिवसेनेच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे राज्य सरकार काही लोकांना हाताशी धरून वातावरण बिघडवायचं आणि जातीय तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा >> “उंटावरून शेळ्या हाकणारे”, राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”

“हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा”

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंच आहे की, हे सरकार नपुंसक आहे. या दंगली म्हणजे यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे. दंगली घडवणं, त्यानंतर संबंधितांवर कारवाई न होणं, दंगलखोरांना प्रोत्साहन देणं, हा यांच्या नपुंसकतेचा सर्वात मोठा पुरावा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says shinde fadnavis government trying to create riots asc
First published on: 31-03-2023 at 10:54 IST