Sanjay Raut Shared Rahul Narvekar’s VIDEO : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असून त्यांच्यामागे अनेक स्थानिक गावकरी दिसत आहेत. या स्थानिकांबरोबर त्यांची बाचाबाची झाल्याचं दिसतंय. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओबाबत जाब विचारला आहे. तर, राहुल नार्वेकर यांनीही यावर उत्तर दिलं आहे.

संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर त्यांनी लिहिलंय की, “विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?”

संजय राऊत माध्यमांना काय म्हणाले?

“जमिनीचे मोजामाप करण्याकरता अधिकाऱ्यांबरोबर हे महाशय गेले. ही जागा गुजरातच्या एका गुंतवणूकदाराच्या नजरेत भरली. त्या जागेचे मालक घरात नसताना, त्यांच्या घरी एक लग्न समारंभ होता. ते घरात नाहीत हे पाहून हे अधिकरी त्यांच्या जमिनीवर गेले. मोजणी सुरू केले. त्यांना जेव्हा कळलं की मोजमाप सुरू केली तेव्हा ते कुटुंब तिथे आले. त्या माऊलींनी अनेकांच्या कानफाट्यात मारल्या, तोही व्हिडिओ समोर येईल. या गुजरातच्या टोलधाडी, भाजपाचे पुढारी, सत्तेवरची मंत्री आणत आहेत. कोकणचं स्मशान करत आहेत. त्याचा भडका या म्हात्रोळी गावात उडाला. मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी या महाराष्ट्राला दाखवलं”, असं संजय राऊत म्हणाले. तसंच, अलिबाग मराठी माणसांचं राहिलं नाही, गुजरातच्या लोकांनी अलिबागसारख्या शांत सुंदर शहराचा ताबा घेतला आहे, असंही ते म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

तर, हाच व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही शेअर केलाय. त्यांनी या व्हिडिओविषयी जरा अधिकची माहिती दिली आहेत. हा व्हिडिओ अलिबागचा असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम केल्याप्रकरणी गावकऱ्यांनी गोंधळ घातला असा दावा त्यांनी आहे.

ते पोस्टमध्ये म्हणाले की, “अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला.

राहुल नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान,राहुल नार्वेकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. “आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो. मी परवा माझ्या शेतजमीनिवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडू नये, ही नम्र विनंती”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

संजय राऊतांचा पुन्हा पलटवार

राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळून लावल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, “तुमचा या व्हिडिओही काही संबंध नसेल तर त्या आड गावात का गेलात? त्या गावात तुमच्या जमिनी आहेत. अलिबागमध्ये आता मराठी माणूस राहिलेला नाही.”