संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत दिल्लीत होते. याचदरम्यान संजय राऊतांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. खुद्द शरद पवारांनी देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर आता संजय राऊतांनी मुंबईत येताच भाजपाला आव्हान दिलं आहे. विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.

“मला ठार माराल? माझी तयारी आहे”

“:तुम्ही आमचं काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे २५ वर्ष तुमचं राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे. राजकीय विरोधक विचारानं सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्यासिवाय राहणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“…ही नामर्दानगी आहे”

आयएनएस विक्रांत घोटाळ्यावरून यावेळी संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “आयएनएस विक्रांतचा घोटाळा भाजपाच्या नेत्यांकडून झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं आज महाराष्ट्रात गावपातळीवर शिवसैनिकांचं आंदोलन झालं. हा संताप आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले केले जात आहेत. ही नमर्दानगी आहे. याविरुद्ध हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावलं पडतील, तशी आमची पावलं पडतील”, असं राऊत म्हणाले आहेत.

ईडी कारवाईवरुन अमृता फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाल्या “मी खूप गोंधळलीये, मध्यमवर्गीय व्यक्ती…”

“भाजपाचे लोक आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे”, असं देखील राऊत म्हणाले. “या आरोपांचं किरीट सोमय्यांकडे उत्तर असू शकत नाही. मी पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. राज्यसभेत त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत. कारण त्यांनाही माहिती आह की घोटाळा झाला आहे”, असं देखील राऊतांनी नमूद केलं.