काँग्रेस खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती आणि ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत बोलताना केलं होतं. या विधानावरून भाजपानं काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींवर टीका करतानाच भाजपानं यात्रेत सहभागी झालेले ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि ठाकरे गट यांच्यावरही टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यांनी राहुल गांधींनाही सल्ला दिला आहे.
“इतिहासात काय घडलं ते चिवडत बसण्यापेक्षा…”
संजय राऊतांनी यावेळी बोलताना राहुल गांधींना सल्ला दिला आहे. “महागाई, बेरोजगारी अशा विषयावर त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. असं असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या वर्गाला वीर सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“सावरकर संघाचे किंवा भाजपाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते”
एककडे राहुल गांधींना सल्ला देतानाच संजय राऊतांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्र सोडलं आहे. “वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं, अशी आमची सातत्याने मागणी आहे. मला कळत नाही, की हे जे नवे सावरकरभक्त निर्माण झाले आहेत, भाजपा किंवा इतर लोक, ते ही मागणी का उचलून धरत नाहीत? वीर सावरकर हे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असं इतिहास सांगतो. पण आत्ता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकरांचा विषय घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांनी पक्षाच्या स्थापनेपासून सावरकरांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे”, अस संजय राऊत यावेळी म्हणाले.
“मी सांगून ठेवतोय, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआमध्ये फूट…”, संजय राऊतांचं मोठं विधान!
मनसेला टोला
दरम्यान, मनसेकडून राहुल गांधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरही संजय राऊतांनी खोचक शब्दांत टोला लगावला. “मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. आपल्या देशात तक्रारी दाखल करणं आणि त्याआधारे प्रसिद्धी मिळवणं हा एक राजकीय उद्योग झाला आहे. आमच्यासारखे लोक त्याचे अनेकदा राजकीय बळी ठरले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.