sanjay raut shivsena thackeray group slams chandrakant patil bjp | Loksatta

“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”

संजय राऊत म्हणतात, “त्या काळात टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न २१ हजार होतं. यांना हे माहिती नाही!”

“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”
संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका (संग्रहीत छायाचित्र)

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, त्यावरून विरोधकांनी आता सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाकडूनही चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं जात आहे. खासदार संजय राऊतांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला. तसेच, चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

शुक्रवारी पैठणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

“आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं”, संजय राऊतांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!

दरम्यान, या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यावर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाही. त्यांनी लोकांकडून पैसे मागितले. आपण वर्गणी मागितली, सीएसआर मागितला असं आज म्हणतो. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील घरोघरी फिरून धान्यही मागायचे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“तुमच्या तिजोरीत येणारे पैसे पक्षाची भीकच”

“ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात, ज्या पक्षाचे प्रवक्ते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षातला हा वंश आहे. हे अकलेचे कांदे आहेत सगळे. मग तुमच्या तिजोरीत येणारे पैसे पक्षाची भीक आहे असंच म्हटलं पाहिजे. तुम्ही जे खोके वाटले, तीही भीकच होती असं म्हटलं पाहिजे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

“तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न टाटांपेक्षा जास्त होतं”

“ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. एकेकाळी ज्योतिराव फुलेंचं उत्पन्न हे टाटांपेक्षा जास्त होतं. त्यांनी आपली सगळी संपत्ती दानधर्मात, शाळा-कॉलेज, दलितांसाठी वापरली. त्या काळात टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न २१ हजार होतं. याची इतिहासात नोंद आहे, हे यांना माहिती नाही. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 11:24 IST
Next Story
Maharashtra Karnataka Dispute: “पुन्हा असं भाष्य केलं तर…”, मुनगंटीवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “ही नेहरुंची चूक”