उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी सूचक शब्दामध्ये केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाला इशारा दिलाय.

“आयकर विभाग, सीबीआय यांच्या माध्यमातून ही राजकीय छापेमारी ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही पण हा अजित पवार यांच्यावरील राजकीय राग असू शकतो,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरू आहे. सर्वच (विरोधी पक्षाच्या) राजकीय नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे,” असंही राऊत म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “हेही दिवस निघून जातील. दिल्लीत आमचे ही दिवस येतील. अपना टाईम भी आयेगा,” असं म्हणत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला सूचक इशारा दिलाय.

पवारांनीही लगावला टोला
एखाद्या व्यक्तीविषयी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधाऱ्यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही असं मत शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुरुवारी व्यक्त केलं. तपास यंत्रणांचा गैरवापर आणखी किती काळ सहन करायचा, हे आता नागरिकांनी ठरवावे असंही पवार म्हणालेत.

उत्तरप्रदेशात शेतक ऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्यानंतर मी या प्रकाराची तुलना जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी केली. त्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याने त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली असावी, असे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकणे, हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक आहे, अशा शब्दांमध्ये पवारांनी नाराजी व्यक्त केली.

दसरा मेळाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया…
“दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल. हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेलं आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. दसरा मेळावा होणार हे नक्की. आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहे. नियम पाळून सण साजरे होत आहेत तर दसरा मेळावाही होईल. मेळावा होणार पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही,” असं राऊत यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना सांगितलं.