चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सरकारच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विविध पक्षांच्या नेत्यांना फोन करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. आम्ही चिंचवड – कसबा पोटनिवडणुकीत सर्व्हे केला असून दोन्ही मतदारसंघातील लोकांना निवडणूक हवी आहे. मतदारांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शिक्षक, पदवीधरांनी जो निर्णय दिला, तसाच चिंचवड-कसबामध्येही लागेल. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे पत्र लिहिले असले तरी निवडणुका होतील”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

फडणवीस कटूता कमी करणार होते, त्याचे काय झाले?

चिंचवड-कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरकारकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखल दिला जात आहे. याचाही समाचार राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वात आधी घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कुणी केली. राजकारण गढूळ कुणी केले? सुडाचे राजकारण कुणी सुरु केले? यावरही चिंतन व्हायला हवे. देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, राजकारणातील कटूता कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण त्यांचे एकही पाऊल याबाबत पडलेले दिसत नाही. याबाबत राज्यातील जनतेला संभ्रम आहे. कसबा-चिंचवडसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढविणार होती, त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चिंचवडच्या जागेबाबत आग्रही आहे. त्याबाबत मविआ लवकरच निर्णय घेईल.”

शिक्षक-पदवीधरप्रमाणे पोटनिवडणुकीचा निकाल लागेल

राऊत पुढे म्हणाले की, “दोन्ही मतदारसंघातील वातावरण सरकारसाठी अनुकूल नाही. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत जनतेने त्यांच्या मनात काय आहे? हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागणार. दोन्ही मतदारसंघात वेगळा निर्णय लागणार, असे जनमाणस दिसत आहे. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला कुणीही संपर्क केलेला नाही. संपर्क होण्याची शक्यता नाही. अंधेरी पोटनिवडणूक अपवाद असला तरी तिथेही निवडणूक झालीच होती, ही बाब लक्षात घ्यायला हवा. नांदेड आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत काय झालं? हे सर्वांना माहीतच आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on chinchwad kasba pune byelection kvg
First published on: 05-02-2023 at 10:29 IST