राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राज्यातील प्रलंबित मंत्रीमंडळ विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांची तयारी असा विषयांवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्राचा हायकमांड मुंबईत बसायचा, पण…”

एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीत जात असल्याचं सांगत संजय राऊतांनी त्यांच्यावर खोचक टीका केली. “महाराष्ट्रात आत्तापर्यंत हायकमांड मुंबईत बसायचा. आता शिंदेंचा हायकमांड दिल्लीत आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या गोष्टी करतात पण दिल्लीत जाऊन मुजरा करतात. खरी शिवसेना कधी दिल्लीत जाऊन कुणाच्या समोर वाकून उभी राहिली नाही. मंत्रीमंडळासाठी हे तिथे जातील, अजून कशासाठी जातील. महाराष्ट्रात जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे असं तुम्ही म्हणता, तर दिल्लीत जायची गरज नाही. इथले निर्णय इथेच व्हायला हवेत”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“उद्धव ठाकरे एकदाच दिल्लीत गेले”

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरे एकदाच दिल्लीत गेल्याचा दाखला दिला. “उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा ते एकदाच दिल्लीत गेले. सगळे निर्णय इथे व्हायचे. आम्ही कधी दिल्लीची गुलामी केली नाही. तुम्हाला जर अमित शाह यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून शिवसेना दिली आहे, तर चालवा ना. दिल्लीत त्यांच्यासमोर वाकून का उभे राहाता? महाराष्ट्र बघतोय”, असा सवाल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना केला.

‘ती’ मोदी सरकारची आवडती स्टंटबाजी होती?’ ठाकरे गटाचा सवाल; ओडिशा रेल्वे अपघातावरून टीकास्र!

“तुम्हाला मंत्रीमंडळ विस्तार करायचाय ना? मग हिंमत असेल तर इथे बसून करा. एक वर्ष झालं विस्तार होत नाहीये याचा अर्थ हे सरकार जाणार आहे. या सरकारवर कायद्याचा दबाव आहे. हे फक्त वेळ काढत आहेत”, असंही ते म्हणाले.

“हे उठसूट दिल्लीत जातात विचारायला…!”

“शिवसेनेला कधी दिल्लीवाऱ्या कराव्या लागत नाहीत. पण ही नकली शिवसेना आहे. महाराष्ट्रात जर खरंच शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, तर तो विस्तारासाठी दिल्लीत परवानगी घ्यायला कशाला जाईल? बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दिल्लीत अर्ज घेऊन उभे राहिले नाहीत. तुमचे नेते कोण ते एकदा सांगा. डुप्लिकेट शिवसेनेनं त्यांचा नेता कोण आहे हे सांगावं. बाळासाहेब ठाकरे की मोदी-शाह? फडणवीस तिथे गेले तर मान्य करतो. त्यांचा मक्का-मदिना दिल्लीत आहे. तुमचं काय आहे? तुम्ही दिल्लीत का धावताय? हे उठसूट दिल्लीत विचारायला जातात, आता काय कराययचं? आता काय निर्णय घेऊ? कुणाला कोणतं पद देऊ? ही आहे का तुमची शिवसेना? ही मांडलिक शिवसेना आहे. ही गुलामी आहे. ही महाराष्ट्राची शिवसेना नाहीये”, अशा शब्दांत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams cm eknath shinde amit shah meeting in delhi with devendra fadnavis pmw
First published on: 05-06-2023 at 10:40 IST