पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांनी मोट बांधली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (२३ जून) देशातले १५ हून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले. या पक्षातील प्रमुख नेत्यांची बिहारमधल्या पाटण्यात बैठक पार पाडली. या बैठकीनंतर राज्यातल्या भाजपा नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला परिवार वाचवण्यासाठी विरोधकांची आघाडी तयार करण्यात येत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावरून सातत्याने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीची चर्चा करत होते, हे पाहून आश्चर्य वाटलं.
देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले म्हणून काल म्हणे देवेंद्र फडणवीसांनी सडकून टीका केली. त्यांना इतकंच सांगेन की, काश्मीर हा हिंदूस्थानचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवलं आहे. त्या सरकारमध्ये तुम्ही होता. मुफ्ती यांच्या शपथविधीला स्वतः पंतप्रधान उपस्थित होते. त्यामुळे अशी सडकून टीका करताना जरा जपून करा.
हे ही वाचा >> “नागपूरचे भाजपा नेते मोदींविरोधात बोलायचे, पण…”, नाना पटोलेंचा टोला; म्हणाले, “सत्तेचा गर्व…”
खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही नवाज शरीफांचा केक कापायला कधी गेलो नाही, किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्यावर आम्ही अधिक चर्चा करू. कदाचित उद्धव ठाकरे आज यावर सविस्तर बोलतील. उगाच तोंडाच्या वाफा दवडू नको. तुचमंच भूत आहे ते आणि तुमचंच पाप आहे.